नाशिक : सातपूरमधील दोन अनधिकृत बंगले तोडले

दोन अधिकृत बंगले तोडले,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून शहरातील विविध भागात धडक कारवाई मोहीम राबविली जात असून, या मोहिमेअंतर्गत सातपूर विभागातील दोन अनधिकृत बंगल्यांवर बुलडोझर चालविण्यात आला आहे. जेसीबी अन् ब्रेकरच्या साहय्याने या बंगल्यांचे बांधकाम तोडण्यात आले असून, परिसरातील इतरही अनधिकृत कामे जमीनदोस्त करण्यात आले आहेत.

नाशिक मनपाने शहरातील अतिक्रमण विरोधात धडक कारवाई सुरु केली आहे. शहराचा मध्यवर्ती भाग शालीमार, पंचवटी भागात कारवाई केल्यानंतर आता उपनगरांमध्ये कारवाई होत आहे. नाशिकरोड, नवीन नाशिक विभागानंतर बुधवारी (दि.१७) सातपूर विभागातील महाराष्ट्र हौसिंग कॉलनी येथे कारवाई करण्यात आली. आनंद शाळा येथील दोन अनधिकृत बंगल्यावर हातोडा पडला आहे. तसेच नवीन नाशिक, सातपूर, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम आणि नाशिकरोड विभागाचे पथक व वाहने कारवाई दरम्यान हजर होते. अतिक्रमण विभागाच्या उपायुक्त करुणा डहाळे, अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त मदन हरीशचंद्र, सातपूर विभागीय अधिकारी डॉ. मयुर पाटील, नगर रचना विभागाचे उपअभियंता रविंद्र बागूल, शाखा अभियंता गोकूळ पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई झाली. यावेळी सातपूर अतिक्रमण विभागाचे मिलिंद जाधव, नवीन नाशिक विभागाचे प्रवीण जाधव, नाशिक पूर्वचे जीवन ठाकरे, नाशिक पश्चिमचे प्रवीण बागूल आदी उपस्थित होते. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.

गोविंदनगर येथील जॉगिंग ट्रॅक, आर डी सर्कल इथे मंगळवारी अतिक्रमण विभागाने रस्त्यावरील विक्रेत्यांवर कारवाई केली होती. तसेच पाथर्डी भागातील सर्व्हे क्रमांक २९५/४ येथील नाल्यावरील अऩधिकृत बांधकाम हटविण्यात आले आहे.

नागरिकांनी स्वत:हून अनधिकृत बांधकामे, पत्र्याचे शेड, टपऱ्या अशा प्रकारचे अतिक्रमण काढून घेण्यात यावे. अन्यथा अतिक्रमण पथकाद्वारे कारवाई करण्यात येईल आणि कारवाईचा खर्च संबंधितांकडून वसुल करण्यात येईल. तसेच रस्त्यावरील विक्रेत्यांवरही कारवाई करण्यात येईल.

– करुणा डहाळे, उपायुक्त, अतिक्रमण विभाग

हेही वाचा :

The post नाशिक : सातपूरमधील दोन अनधिकृत बंगले तोडले appeared first on पुढारी.