Site icon

नाशिक : सातपूर गोळीबारातील मुख्य संशयित ताब्यात, आतापर्यंत सहा आरोपी गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पूर्ववैमनस्यातून पाठलाग करीत एकावर गोळीबार करून धारदार शस्त्रांनी वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना १९ मार्चला सातपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी तपास करून हल्ल्यातील मुख्य संशयिताला गुरुवारी (दि. 30) धुळे येथून ताब्यात घेतले. या गुन्ह्यात आतापर्यंत पोलिसांनी सहा संशयितांना अटक केली आहे.

भूषण किसन पवार (२६), रोहित मंगलदास अहिरराव (२७), गणेश राजेंद्र जाधव (२६), किरण दत्तात्रेय चव्हाण (२४, चौघे रा. शिवाजीनगर, सातपूर), आशिष राजेंद्र जाधव (२८, रा. शिवाजी चौक) व सोमनाथ झांजर उर्फ सनी (२२, रा. सातपूर) अशी पकडलेल्या संशयितांची नावे आहेत. पोलिस उपआयुक्त प्रशांत बच्छाव यांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष जाधव व फिर्यादी राहुल पवार हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यात भावांच्या खुनावरून पूर्ववैमनस्य होते. त्याचा बदला घेण्यासाठी मुख्य संशयित आशिष जाधव व इतरांनी कट रचून राहुल पवार व तपन जाधव यांचा कारमधून पाठलाग केला होता. त्यात संशयितांनी त्यांची कार तपनच्या कारवर आदळवून हवेत गोळीबार तसेच तपनवर शस्त्रांनी वार केले होते. त्यानंतर संशयित एका कामगाराची दुचाकी घेऊन पसार झाले होते. या प्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात संशयितांविरोधात राहुल पवारच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी तपास केला असता, या गुन्ह्यात आशिष जाधवला इतरांनी मदत केल्याचे समजले. त्यात तपन व राहुल यांचा माग संशयितांनी काढला व त्याची माहिती आशिषला दिली. त्यानुसार त्यांनी दोघांवर प्राणघातक हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले. गुन्हा करून संशयित फरार झाले होते. मात्र गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने तपास करून संशयितांना नाशिक, धुळे शहरांमधून ताब्यात घेतले. पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त वसंत मोरे, पोलिस निरीक्षक विजय ढमाळ, अंमलदार रवींद्र बागूल, प्रवीण वाघमारे, प्रदीप म्हसदे, नाझिमखान पठाण, योगीराज गायकवाड, संदीप भांड, विशाल देवरे, प्रशांत मरकड, महेश साळुंके यांच्या पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा : 

The post नाशिक : सातपूर गोळीबारातील मुख्य संशयित ताब्यात, आतापर्यंत सहा आरोपी गजाआड appeared first on पुढारी.

Exit mobile version