नाशिक : ‘सारथी’च्या कार्यालयाची खासदार गोडसेंकडून पाहणी

सारथी कार्यालय पाहणी,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिकरोड येथील ‘सारथी’ कार्यालयाच्या तात्पुरत्या कार्यालयाचे कामकाज सुरू आहे. खासदार हेमंत गोडसे यांनी या कार्यालयाची नुकतीच पाहणी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. या पार्श्वभूमीवर ‘सारथी’च्या कार्यालयाची जागअतिशय योग्य ठिकाणी असून, प्रशस्त आहे. ‘सारथी’त प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांना दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय सोयीच्या ठिकाणी कार्यालय असल्याचे खा. गोडसे यांनी सांगितले.

मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या विद्यार्थ्यांसाठी पुण्याच्या धर्तीवर नाशिकच्या विभागीय कार्यालयासाठी शासनाने प्रशासनाकडे नुकतीच जागा हस्तांतरित केली. या जागेवर ‘सारथी’ कार्यालयाचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत नाशिकरोड येथे भाडेतत्त्वावर जागा घेण्यात आली आहे. या कार्यालयाची रंगरंगोटी, डागडुजी, फर्निचर आदी कामे सुरू आहेत. पुण्याच्या धर्तीवर राज्याच्या महसुली शहरांमध्ये सारथीचे कार्यालय असावे, यासाठी माजी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले, खा. गोडसे यांच्यासह मराठा समाजातील विविध संघटनांचे पदाधिकारी प्रयत्नशील होते. अखेर या सर्वांच्या प्रयत्नांना यश आले असून, त्र्यंबक रोडवरील पंचायत समिती कार्यालयाच्या पाठीमागे ‘सारथी’साठी शासनाने जागा दिली आहे.

खा. गोडसे यांनी जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्याकडे पाठपुरावा करून ही जागा हस्तांतरित करून घेतली. तेथे उभारण्यात येणार्‍या कार्यालयाच्या इमारतीसाठी तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत नाशिकरोड येथे तात्पुरत्या स्वरूपात ‘सारथी’चे कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. उत्तर महाराष्ट्रातून येणार्‍या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने या कार्यालयात अधिकाधिक सोयी सुविधा असाव्यात, अशा सूचना खा. गोडसे यांनी केल्या. यावेळी गोडसेंसोबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी नामदेव खेडकर, शाखा अभियंता सचिन शेळके, एडीपीओ चंद्रमोहन कुटे आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

The post नाशिक : ‘सारथी’च्या कार्यालयाची खासदार गोडसेंकडून पाहणी appeared first on पुढारी.