नाशिक : सारूळच्या खाणीत पोखरले उभे डोंगर, प्रशासनाच्या पाहणीत धक्कादायक प्रकार उघड

सारुळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील सारूळ येथे स्ट्रोनक्रशर चालकांनी थेट उभे डोंगर पोखरल्याचा धक्कादायक प्रकार जिल्हा प्रशासनाच्या पाहणीत उघड झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारत 19 चालकांचे क्रशर मशीन सील केले. परंतु, क्रशरचालक डोंगर पोखरेपर्यंत प्रशासन झोपा काढत होते का, असा संतप्त सवाल पर्यावरणप्रेमीकंडून उपस्थित केला जात आहे.

जिल्ह्यातील अवैध गौण खनिज उपशाविरोधात जिल्हाधिकारी गंगाथरन डी. हे अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत. दोनच दिवसांपूर्वी सारूळ येथील 19 तर राजूरबहुला व पिंपळद येथील प्रत्येकी एक स्ट्रोनक्रशरवर प्रशासनाने कारवाई करत ते सील केले आहेत. या कारवाईनंतर जिल्हा गौण खनिज विभाग चर्चेत आला आहे. स्ट्रोनक्रशर चालकांविरोधात थेट जिल्हाधिकार्‍यांना मैदानात उतरावे लागल्याने गौण खनिज विभागाच्या कारभारावरच संशयाचे मळभ निर्माण झाले आहे. मात्र, ही बाब एवढ्यावरच थांबली नसून सारूळ परिसरातील उभे डोंगरच स्ट्रोनक्रशर चालकांनी फोडल्याचे प्रशासनाच्या पाहणीत उघड झाले आहे.

वास्तविक, अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात प्रशासनाची पथके तैनात आहेत. या पथकांनी दगडखाणी, वाळूघाट यांची नियमित पाहणी करणे अपेक्षित आहे. पण, असे असताना प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सारूळमध्ये क्रशरचालकांनी डोंगरांनाच नख लावल्याचे प्रकार घडले आहेत. जिल्हाधिकार्‍यांच्या दट्ट्यानंतर गौण खनिज विभागाने संबंधित ठिकाणचे 19 क्रशर सील करत कारवाईची मलमपट्टी केली. परंतु, पर्यावरण रक्षणाच्या दृष्टिकोनातून ही गंभीर बाब असताना गौण खनिज विभागाच्या वरवरच्या कारवाईमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

शासनाच्या नियमानुसार डोंगर खोदण्यास मनाई आहे. सारूळ येथील कारवाईवेळी स्ट्रोनक्रशर चालकांनी उभे डोंगर पोखरल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तातडीने कारवाई करत तेथील 19 क्रशर सील करण्यात आले आहेत. यापुढेही जिल्ह्यात अशा प्रकारच्या धडक कारवाया करण्यात येणार आहेत.
– गंगाथरन डी., जिल्हाधिकारी, नाशिक.

ठोस कारवाई कधी?
सारूळसह जिल्ह्यातील दगड-खाणींमध्ये यापूर्वी जिल्हा गौण खनिज विभागाने कारवाया केल्या खर्‍या; पण प्रत्येकवेळी अधिकच्या उत्खननाची रॉयल्टी भरून तसेच प्रसंगी न्यायालयात धाव घेत स्ट्रोनक्रशर चालकांनी सुटका करून घेतली आहे. आताच्या कारवाईतही असेच काहीसे घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रशासन नुसते तपासणीचे सोपस्कार पार न पाडता ठोस कारवाई करणार का? हाच कळीचा मुद्दा आहे.

हेही वाचा :

 

The post नाशिक : सारूळच्या खाणीत पोखरले उभे डोंगर, प्रशासनाच्या पाहणीत धक्कादायक प्रकार उघड appeared first on पुढारी.