नाशिक : सावधान.. एकाच कंपनीच्या पांढऱ्या रंगाच्या सहा कारची चोरी

car www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरासह जिल्ह्यात कार चोरणाऱ्या टोळीने धुमाकूळ घालत ह्युंडाई क्रेटा या कंपनीच्या चक्क सहा कार चाेरून नेल्या आहेत. नागरिकांच्या पसंतीत उतरलेल्या या कारवर चोरटे फिदा आहेत. पण विशेष म्हणजे चोरट्यांनी पांढऱ्या रंगाच्याच कार लंपास केल्या आहेत. शहर पोलिसांनी चोरट्यांचे आव्हान स्वीकारत स्वतंत्र पथक नेमत त्यांचा माग काढण्यासाठी विशेष ऑपरेशन आखले आहे.

शरणपूर रोडवरील पंडित कॉलनीतून १२ सप्टेंबरला दहा लाख रुपयांची कार चोरट्यांनी रात्री चोरली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस तपास करत असताना चार ऑक्टोबरला पुन्हा शरणपूर रोडवरील जैन मंदिराजवळून व सातपूरमधील काळेनगर परिसरातून याच कंपनीच्या दोन पांढऱ्या कार चोरीस गेल्या. या वाहनांचा शोध घेत असतानाच १६ ऑक्टोबरला गंगापूर रोडवरील शांतिनिकेतन कॉलनीमधून एक कार व १८ ऑक्टाेबरला मखमलाबाद नाका येथून कार चोरीस गेल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर १९ ऑक्टोबरला निफाड येथील उगाव रोडवरून पांढऱ्या रंगाची ह्युंडाई क्रेटा कार लंपास झाली.

पोलिसांना सर्व चोरींमध्ये साम्य आढळून आले असून, चोरट्यांनी पांढऱ्या रंगाचीच आणि त्याही ह्युंडाई क्रेटा हेच मॉडेल चोरले आहे. निफाड येथील कार चोरताना चोरट्यांनी नाशिक शहरातून चोरलेल्या कारचा वापर केल्याचे पोलिस तपासात उघड झाले. त्यामुळे कार चाेरणारे चोरटे एकाच टोळीतील असल्याचा संशय आहे. या गुन्ह्यांचा शास्त्रीय पद्धतीने तपासासाठी पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी गुन्हे सहायक आयुक्त वसंत मोरे यांना सूचना दिल्या आहेत. त्यानुसार गुन्हे शाखा एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ आणि गुन्हे शाखा दोनचे वरिष्ठ निरीक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली एक सहायक पोलिस निरीक्षक व सहा अंमलदारांचे पथक फक्त या गुन्ह्यांचा तपास करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तांत्रिक विश्लेषणातून चोरट्यांविषयी काही धागेदोरे हाती लागले आहेत.

राजस्थानात कार नेल्याचा अंदाज…

चोरट्यांनी एकाच कंपनीच्या विशिष्ट मॉडेलच्या वाहनावर लक्ष केंद्रित करून कार चोरल्या आहेत. या कारची सुरक्षा नव्याने अद्ययावत केली असली तरी ज्या कार चोरीस गेल्या त्या पाच ते आठ वर्षे जुन्या तंत्रज्ञानाच्या असल्याने चोरट्यांनी कारची काच फोडून बनावट चावीचा वापर करून वाहने लंपास केल्याचा अंदाज आहे. तसेच कारच्या सॉफ्टवेअरमध्ये फेरफार करूनही कार चोरल्याचे दिसते. शहरासह ग्रामीण भागातील काही सीसीटीव्ही पाहणीत चोरटे राजस्थानच्या दिशेने गेल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला आहे.

नवी टोळी सक्रिय…

याआधीही पोलिसांनी विशिष्ट कार चोरणाऱ्या चोरट्यांना पकडले होते. पोलिसांनी केलेल्या तपासात ते सध्या कारागृहातच असल्याने चोरटे दुसऱ्या टोळीतील असल्याचा अंदाज आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : सावधान.. एकाच कंपनीच्या पांढऱ्या रंगाच्या सहा कारची चोरी appeared first on पुढारी.