नाशिक : साहित्य खऱ्या अर्थाने वंचितांचा हुंकार व्हावा

वंजारी साहित्य संमेलन,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

साहित्य हे वैश्विक जाणिवेचे असावे. तुम्ही आणि साहित्य वेगळे नाही या भावनेतून लिखाण झाल्यास ते एकजिनसी होईल अन् त्याच साहित्यातून खऱ्या अर्थाने वंचितांचा हुंकार होणे आवश्यक आहे, असा सूर वंजारी महासंघातर्फे राज्यस्तरीय साहित्य संमेलनात निघाला.

वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य साहित्य आघाडीतर्फे समाजाचे पहिले एकदिवसीय राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन रविवारी (दि. २५) रावसाहेब थोरात सहभागृहात पार पडले. त्यावेळी अध्यक्षस्थानी प्रा. वा. ना.आंधळे होते. व्यासपीठावर स्वागताध्यक्ष प्रशांत आंधळे, संत साहित्याचे अभ्यासक डॉ तुळशीराम महाराज गुट्टे, वंजारी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश खाडे, डॉ. लक्षराज सानप, डॉ विजय दहिफळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, कांचन खाडे, गणेश खाडे, ज्येष्ठ उद्योजक बुधाजी पानसरे, दामोदर मानकर, माधुरी पालवे, के. के. सानप, मारुती उगले , दिव्यांग आघाडीचे बालासाहेब घुगे, बाळासाहेब सोनवणे, लेखिका लता गुठे, लक्ष्मण जायभावे, रणजित आंधळे, ॲड तानाजी जायभावे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रा. आंधळे म्हणाले की, साहित्यातून सामाजिक विषमता मांडता आली पाहिजे. ती वाचन, अनुभवातून येते. साहित्य, समाज अन् नात्यांपलीकडे साहित्य असते. सामूहिक पद्धतीने लढा दिल्यास त्याला यश मिळते. त्यामुळे येथून पुढे देखील अधिक ताकद लावून साहित्य संमेलन भरवून , समाजाला चांगली दिशा देण्याचे आवाहन त्यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समवेत आपला समाज सरदार, त्यानंतर व्यापारी, शेतकरी आणि आज विविध क्षेत्रात आघाडीवर असल्याचे आंधळे म्हणाले.

हुंडा पद्धत, वाढते घटस्फोट, बेरोजगारी हे समाजातील मुख्य प्रश्न असून ते सोडवण्यासाठी संघटीत होण्याची गरज असल्याचे आवाहन डॉ. लक्षराज सानप यांनी केले. विचारांबरोबरच समाजाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी महासंघ काम करत असल्याचे ते म्हणाले. समाज सर्व क्षेत्रात आघाडीवर असून ही वाटचाल अशीच सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे भटक्या विमुक्तच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष कांचन खाडे यांनी सांगितले.

हेही वाचा :

The post नाशिक : साहित्य खऱ्या अर्थाने वंचितांचा हुंकार व्हावा appeared first on पुढारी.