नाशिक : सिंहस्थासाठी इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर

सिंहस्थ www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी स्मार्ट सिटी कंपनी नाशिक महापालिकेत इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर उभारणार आहे. या सेंटरसाठी 70 कोटींचा खर्च येणार असून, त्यातून सेंटरबरोबरच साधुग्रामकरता ड्रोन कॅमेरे व सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहे.

नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. च्या संचालक मंडळाची 23 वी बैठक शनिवारी (दि.24) अध्यक्ष तथा अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) आनंद लिमये यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी गंगाथरन. डी, पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्या संचालक म्हणून नियुक्तीस मान्यता देण्यात आली. कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक महापालिकेस उपयुक्त ठरणार्‍या इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर या प्रकल्पाच्या निविदेस मान्यता देण्यात आली. महापालिका आणि पोलिस प्रशासनाने कुंभमेळ्याच्या सिंहस्थासाठी इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर अनुषंगाने संबंधित प्रकल्पाबाबत स्मार्ट सिटी कंपनीला सूचना केली होती. त्यानुसार साधुग्राममध्ये सुमारे 200 सीसीटीव्ही बसविण्यात येणार असून, शहर तसेच साधुग्राम परिसरात चार ड्रोनच्या सहाय्याने बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे. हे ड्रोन आणि सीसीटीव्ही हे मनपात साकारण्यात येणार्‍या इमर्जन्सी आॉपरेशन सेंटरशी जोडले जाणार आहेत. एक वर्ष मुदतीत प्रकल्प उभारला जाणार आहे. प्रकल्पासाठी एकूण 70 कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याचे कंपनीचे सीईओ सुमंत मोरे यांनी सांगितले. भूमिगत जलवाहिनी, विद्युत वाहिनींचे जीआयएस मॅपिंगसाठी राबविण्यात येणार्‍या निविदेबाबत आणि त्यासाठी नेमण्यात येणार्‍या एजन्सीबाबत बैठकीत माहिती देण्यात आली. जलशुद्धीकरण केंद्र, स्काडा आणि वॉटर मीटरसंबंधी निविदा आणि प्रकल्पाकरता एजन्सी नियुक्तीबाबत बैठकीत माहिती देण्यात आली. शहरातील वाणिज्यिक वापर असलेल्या सुमारे साडेसात हजार ठिकाणी वॉटर मीटर प्रायोगिक तत्त्वावर बसविण्यात येणार असून, त्यापैकी एक हजार ठिकाणचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. 110 जलकुंभ आणि नऊ जलशुध्दीकरण केंद्रांच्या ठिकाणी स्काडा मीटर बसविण्यात येणार असल्याचे सीईओ सुमंत मोरे यांनी सांगितले. बैठकीस भास्कर मुंढे, तुषार पगार आणि स्मार्ट सिटीचे विभागप्रमुख उपस्थित होते.

होळकर पुलासाठी स्मार्ट ब्रीज प्रणाली : सुमारे 120 वर्षे जुन्या असलेल्या अहिल्याबाई होळकर पुलाच्या सुरक्षिततेसाठी स्मार्ट  ब्रीजप्रणाली बसविण्यात येणार आहे. ब्रीज सर्विलन्स सिस्टिम असे या प्रणालीचे नाव असून, या प्रणालीव्दारे पुलाविषयीच्या घडामोडींच्या नोंदी स्मार्ट सिटी कंपनीला रोजच्या रोज कळणार आहे. एखादे अवजड वाहन पुलावरून गेले किंवा इतर काही प्रकारचे हादरे बसल्यास त्याबाबतची माहिती संबंधित प्रणालीमुळे उपलब्ध होणार आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : सिंहस्थासाठी इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर appeared first on पुढारी.