Site icon

नाशिक : सिंहस्थासाठी प्राथमिक आराखडा तयार करण्याचे मनपा आयुक्तांचे आदेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सन 2027-28 मध्ये नाशिकनगरीत होणार्‍या सिंहस्थ कुंभमेळा नियोजनाच्या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी गठीत केलेल्या 14 अधिकार्‍यांचा समावेश असलेल्या समन्वय समितीची बुधवारी (दि.14) बैठक घेतली. या बैठकीत सिंहस्थासाठी प्राथमिक आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच 60 किमी बाह्य रिंग रोडचा प्रस्तावही तयार करण्याचे निर्देश देण्यात आले.

नाशिकमध्ये 2027-28 मध्ये होणारा सिंहस्थ कुंभमेळा पर्यावरणपूरक तसेच इतरही नावीन्यपूर्ण संकल्पनेवर आधारलेला असावा, अशी सूचना करण्यात आली असून, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन करण्याच्या सूचना केल्या होत्या. महापालिकेकडे साधुग्रामसाठी उपलब्ध जागा, नव्या जागेची मागणी व प्रत्यक्षात भूसंपादन याबाबतची माहिती गमे यांनी मनपाकडून मागवली होती. त्यानुसार आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सिंहस्थाचे नियोजन तसेच समन्वयाच्या दृष्टीने 14 अधिकार्‍यांची समन्वय समिती गठीत केली होती. सिंहस्थ कुंभमेळा समन्वय अधिकारी म्हणून शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांची नियुक्ती केली असून, या समितीची पहिली बैठक बुधवारी (दि.14) पार पडली. बांधकाम विभागाने प्राधान्यक्रमानुसार कामे व योजनांचा आराखडा तयार करण्याची सूचना केली. नगर रचना व मिळकत विभागाने पायाभूत सुविधा, आवश्यक भूसंपादन तसेच आरोग्य व वैद्यकीय विभागाने सेवेसंदर्भात प्राथमिक आराखडा तयार करण्याची सूचना आयुक्तांनी केली. सिंहस्थ काळात होणारी गर्दी लक्षात घेता नियोजन करण्यात येणार असून, रस्ते, पार्किंग यासाठीच्या जागा शोधण्याची सूचना केली आहे. तसेच आयुक्त डॉ. पुलकुंडवार येत्या दोन दिवसांत संपूर्ण गोदाकाठाची अधिकार्‍यांसोबत पाहणी करणार आहेत.

कुंभमेळ्यापूर्वीच रिंग रोड होणार पूर्ण
शहरालगत सध्या 60 किमी लांबीचा व 30 मीटर रुंदीचा बाह्य रिंग रोड आहे. जवळपास 30 किमीचे काम पूर्ण झाले आहे. अपूर्ण राहिलेल्या रस्त्यांचे काम पूर्ण करताना तो 60 मीटर रुंद करण्यात येणार आहे. त्यानुसार रिंग रोडसाठी स्वतंत्र प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश आयुक्तांनी बांधकाम विभागाला दिले आहेत. त्यामुळे सिंहस्थापूर्वी बाह्य रिंग रोडचे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : सिंहस्थासाठी प्राथमिक आराखडा तयार करण्याचे मनपा आयुक्तांचे आदेश appeared first on पुढारी.

Exit mobile version