नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी सेवानिवृत्तांचे अनुभव जाणून घेणार

कुंभमेळा नाशिक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन सेवानिवृत्त झालेल्या अधिकार्‍यांना मनपाच्या व्यासपीठावर निमंत्रित करणार असून, निवृत्तांचे अनुभव महापालिकेला सिंहस्थाचे नियोजन करताना महत्त्वाचे ठरणार आहेत. निवृत्तांबरोबरच लोकप्रतिनिधी, नागरिकांच्या सूचनाही मनपा जाणून घेत नियोजन करणार आहे.

नाशिक येथे 2027-28 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. 2015 मध्ये मागील कुंभमेळा पार पडला. या सिंहस्थाकडे पर्यावरणपूरक म्हणून पाहिले गेले आणि त्यानुसारच नियोजन करण्यात आले होते. यावेळचा कुंभमेळादेखील नावीन्यपूर्ण संकल्पनांवर आधारित असावा, या दृष्टीने नियोजन करण्यात येणार असून, त्यानुसार नाशिकमधील साधू-महंतानी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे दीड महिन्यांपूर्वीच साकडे घालत विविध मागण्या केलेल्या आहेत. त्यानुसार गमे यांनी साधुग्रामसाठी उपलब्ध असलेली जागा, प्रत्यक्षातील भूसंपादन आदी प्रकाराची तांत्रिक माहिती मनपाकडून मागविली आहे.

गमे यांनी केलेल्या सूचनेनुसार मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी अधिकार्‍यांची बैठक बोलावत सिंहस्थ कामांचा आढावा घेतला. सिंहस्थापूर्वी पायाभूत सुविधांसाठी बांधकाम विभागाने आराखडा तयार करावा, नगररचना व मिळकत विभागाने पायाभूत सुविधांसाठी आवश्यक असलेले भूसंपादन तसेच आरोग्य व वैद्यकीय विभागाने सेवेसंदर्भात आराखडा तयार करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.

आगामी सिंहस्थ कुंभमेळा हा प्रदूषणमुक्त असण्यास प्राधान्य दिले जाणार असून, त्यानुसारच नियोजन करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. नमामि गोदा प्रकल्प गोदा प्रदूषणाच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. त्यानुसार कुंभमेळ्यापर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. गोदावरीत मिसळणारे सांडपाणी एसटीपीकडे वळविण्यात येणार आहे.

नागरिकांसाठी थेट पोर्टल
नागरिकांकडून कुंभमेळ्यासंदर्भात सूचना मागविण्यात येणार आहेत. कुंभमेळ्यासाठी आवश्यक असलेल्या सूचना नागरिकांना थेट पोर्टलवर मांडण्यासाठी व्यासपीठ तयार करून दिले जाणार आहे. याआधीच्या सिंहस्थ कुंभमेळ्यात चांगली कामगिरी केलेल्या मनपाच्या सेवानिवृत्त अधिकार्‍यांना नियोजनात सामावून घेतले जाणार आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी सेवानिवृत्तांचे अनुभव जाणून घेणार appeared first on पुढारी.