नाशिक : सिटीलिंकची शहरासाठी पाच, ग्रामीणसाठी १० रुपये भाडेवाढ

सिटीलिंक बससेवा, www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक महानगर परिवहन महामंडळ अर्थात सिटीलिंकच्या शहर बससेवेची नवीन भाडेवाढ दि. १५ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून लागू करण्यात आली आहे. यामुळे नाशिककर प्रवाशांना यापुढे अधिकचे तिकीट दर मोजावे लागणार असून, शहरी भागात दोन ते पाच रुपये, तर ग्रामीण भागासाठी सुमारे १० रुपयांची भाडेवाढ झाली आहे.

इंधनदरातील वाढ आणि वाढणारा आर्थिक तोटा लक्षात घेता नाशिक महानगर परिवहन महामंडळाने भाडेवाढ करण्याचा निर्णय घेत त्यास मंजुरी दिली होती. महामंडळाच्या नियमानुसार दरवर्षी साधारणपणे पाच टक्के भाडेवाढ करता येते. परंतु, महामंडळाला होणारा तोटा आणि इंधनदरवाढ लक्षात घेता महामंडळाने पाचऐवजी सात टक्के तिकीट दरवाढ करण्याचा निर्णय घेत त्यास मंजुरी देऊन तो प्रस्ताव आयुक्तांकडे सादर केला होता. पाच टक्क्यांऐवजी अतिरिक्त दोन टक्के वाढ असल्याने हा प्रस्ताव आयुक्तांच्या मंजुरीने जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी दीड महिन्यांपूर्वी सादर केला होता. मात्र, याच कालावधीत पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने भाडेवाढीचा प्रस्ताव अडकला होता. २ फेब्रुवारीला आचारसंहिता उठताच प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या भाडेवाढीला हिरवा कंदील दिला. यामुळे १५ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून भाडेवाढ लागू करण्यात आली.

खरे तर १ जानेवारी २०२३ पासूनच भाडेवाढ लागू करण्यात येणार होती. मात्र, उशिराने अखेर १५ फेब्रुवारीपासून भाडेवाढ लागू होत आहे. याबाबत महानगर परिवहन महामंडळाने प्रवाशांना आवाहन करत भाडेवाढीची नोंद घेण्याचे कळविले. नव्या भाडेवाढीमुळे शहरी भागात साधारणपणे दोन ते पाच रुपये आणि ग्रामीण भागात म्हणजे सिन्नर, गिरणारे, दिंडोरी, त्र्यंबक या ग्रामीण भागातील प्रवासासाठी प्रवाशांना सुमारे १० रुपये अतिरिक्त माेजावे लागणार आहेत.

सुखकर, अद्ययावत, सुरक्षित प्रवास नाशिककरांना उपलब्ध करून देण्यासाठी सिटीलिंक नेहमीच प्रयत्नशील आहे. त्यासाठी प्रवासी नागरिकांनी सिटीलिंकच्या भाडेवाढीच्या निर्णयाला देखील सहकार्य करावे.

– एस. एम. चव्हाणके, मुख्य कार्यकारी अधिकारी, सिटीलिंक

हेही वाचा : 

The post नाशिक : सिटीलिंकची शहरासाठी पाच, ग्रामीणसाठी १० रुपये भाडेवाढ appeared first on पुढारी.