नाशिक : सिटीलिंकला दीड लाखाचा दंड, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाची कार्यवाही

सिटीलिंक बससेवा, www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने मनपाच्या सिटीलिंक शहर बससेवेच्या नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापकास दीड लाख रुपये दंड ठोठावला. सिटीलिंक बसने प्रवास करणाऱ्या अपंग महिला प्रवाशाच्या अपघातास जबाबदार धरत ग्राहक तक्रार निवारण आयोगाने हा दंड केला आहे.

सातपूर येथील ज्योती धुमाळ या कामानिमित्त दररोज सातपूर-पंचवटी असा शहर बसने प्रवास करतात. गेल्या वर्षी ११ ऑगस्टला पंचवटीतून बारदान फाटा येथे जाण्यासाठी त्या बसमधून प्रवास करत होत्या. प्रवासात बसचालक सातत्याने वाहन चालवताना फोनवर बोलत होता. याबाबत चालकाकडे तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष झाल्याने सातपूर कॉलनी ते आनंदछाया बस थांबादरम्यान सिटीलिंकने दुसऱ्या सिटीलिंक बसला धडक दिली. यात धुमाळ या बसमध्ये खाली पडून जखमी झाल्या होत्या. जिल्हा रुग्णालय व खासगी रुग्णालयात उपचार घेताना त्यांना मोठा खर्च करावा लागला. त्यामुळे त्यांनी नुकसानभरपाईसाठी ग्राहक तक्रार निवारण आयोगात तक्रार केली होती. नाशिक महानगर परिवहन महामंडळाने संबंधित प्रवाशाला दीड लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी तसेच दरसाल दरमहा 10 टक्के व्याजासह भरपाई द्यावी आणि मानसिक त्रासापोटी १० हजार, अर्जाचा खर्च पाच हजार रुपये देण्याचे निर्देश आयोगाने दिले होते.

दरम्यान, अपघाताबाबत धुमाळ यांनी सिटीलिंकच्या कार्यालयास माहिती देऊनही त्या तक्रारीची दखल महामंडळाने घेतली नाही. धुमाळ या दिव्यांग आहेत. त्यांच्याविषयी असंवेदनशीलता दाखवत सेवेत कमतरता ठेवल्याचा ठपकाही आयोगाने महामंडळ व्यवस्थापनावर ठेवला आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : सिटीलिंकला दीड लाखाचा दंड, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाची कार्यवाही appeared first on पुढारी.