नाशिक : सिटीलिंक कर्मचार्‍यांच्या सतर्कतेमुळे गवसला हरवलेला मुलगा

missing boy,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा 

नाशिक शहराची प्रवास वाहिनी असलेल्या सिटीलिंकमधील कर्मचारी प्रवाशांना सुखकर व सुरक्षित प्रवास देण्यासाठी नेहमीच तत्पर असतात. त्याचाच प्रत्यय पुन्हा आला. आपली कामगिरी बजावत असतांना सिटीलिंक कर्मचार्‍यांची सतर्कता व जागरुकता समोर आली. कर्मचार्‍यांच्या जागरुकतेमुळे हरवलेला शालेय विद्यार्थी गवसला. आणि कर्मचाऱ्यांनी त्याला सुखरूपपणे आईवडिलांकडे सुपूर्द केले.

नाशिक शहरालगत असणार्‍या मखमलाबाद गावातील श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता नववीच्या वर्गात शिकणारा विद्यार्थी घरात झालेल्या किरकोळ वादामुळे शाळेत न जाता शाळेच्या गणवेशात नाशिकमध्ये भरकटत होता. त्याचवेळी हा मुलगा निमाणी बसस्थानक येथे आढळून आल्यानंतर निमाणी बस स्थानकाचे जागरूक कंट्रोलर चंद्रकांत आव्हाड यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी त्या मुलाला कंट्रोल रुममध्ये बसविले व त्याची विचारपूस केली. मुलगा शालेय गणवेशात असल्याने त्याचे वह्या पुस्तके बघून त्यावरील शाळेचे नाव लक्षात आले. त्यानुसार शाळेशी संपर्क साधून मुलाच्या आईवडिलांचा शोध घेण्यात आला. अखेर त्या मुलाचे आईवडील निमाणी बस स्थानकात आले. आणि मुलाला सुखरूपरित्या आईवडिलांच्या ताब्यात देण्यात आले. यावेळी मुलाच्या आईवडिलांनी नाशिक महानगर परिवहन महामंडळाचे (सिटीलिंक) निमाणी बसस्थानक प्रमुख भगवान मुंढे, वाहतूक नियंत्रक चंद्रकांत आव्हाड यांचे विशेष आभार व्यक्त केले.

विद्यालयातर्फे कर्मचाऱ्यांचा सत्कार

सिटीलिंक कर्मचार्‍यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातर्फे निमाणी बसस्थानक प्रमुख भगवान मुंढे, वाहतूक नियंत्रक चंद्रकांत आव्हाड यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व शिक्षकांतर्फे सिटीलिंक कर्मचार्‍यांच्या कामाचे कौतुक करण्यात आले. तसेच पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी, असे आवाहन याप्रसंगी करण्यात आले.

हेही वाचा : 

The post नाशिक : सिटीलिंक कर्मचार्‍यांच्या सतर्कतेमुळे गवसला हरवलेला मुलगा appeared first on पुढारी.