नाशिक : सिटीलिंक वाहकांच्या बोनसमधून राजकीय ठेकेदारांची ‘दिवाळी’

सिटीलिंक नाशिक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सिटीलिंक बसेसच्या वाहकांना ठेकेदारांकडून कधीही वेळेत वेतन दिले जात नसल्याने जवळपास 350 वाहकांनी कामबंदचा इशारा दिला असून, दिवाळीत बोनसपोटी दिलेली १० लाख रुपयांची रक्कम कर्मचाऱ्यांना न देता, ठेकेदाराने परस्पर आपल्या खिशात वळती केल्याने ठेकेदारांचे पितळ उघडे पडले आहे.

भाजपने आपला महत्त्वाकांक्षी प्रकल्प शहर बससेवा २०२० मध्ये सुरू केली. परंतु, हा प्रकल्प म्हणजे ठेकेदारांचा खिसा गरम करणाराच असल्याने कर्मचाऱ्यांचे शोषण केले जात आहे. गेल्या दोन महिन्यांपासून ३५० वाहक वेतनापासून वंचित आहेत, तर आजपर्यंत कधीही वेळेवर वेतन दिले जात नसल्याने वाहक राजीनामा देण्याच्या मनस्थितीत आले आहेत. याच मानसिकतेतून गेले दोन दिवस वाहकांकडून सिटीलिंक कार्यालयासमोर निदर्शने केली जात आहेत. विशेष म्हणजे दिवाळीत महापालिकेसह इतरही खासगी आस्थापनांकडून कर्मचाऱ्यांना बोनस देऊन दिवाळीची भेट दिली जात असताना सिटीलिंक बसवाहकांच्या ठेकेदारांनी मात्र कर्मचाऱ्यांना बोनस मिळावा म्हणून दिलेली ॲडव्हान्सची रक्कमही स्वत:च्या खिशात घातली आहे. त्यामुळे हा प्रकार म्हणजे मृतदेहाच्या टाळूवरचे लोणी खाण्यासारखाच असल्याचे म्हणत कर्मचाऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

कर्मचाऱ्यांवर मनसे, शिवसेनेचा दबाव

दोन महिन्यांचे वेतन आणि बोनस मिळावा, वाहक कर्मचाऱ्यांनी मनपा आयुक्तांसह कामगार उपआयुक्तांना निवेदन दिले आहे. कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन तसेच राजीनामे देण्याचा इशारा देताच ठेकेदार वठणीवर आले असून, दोन्ही ठेकेदार हे मनसे आणि शिवसेनेशी संबंधित पदाधिकारी असल्याने कर्मचाऱ्यांवर राजकीय दबाव आणला जात आहे. महापालिकेतील बहुतांश ठेके हे राजकीय लोकांच्याच हाती असल्याने कर्मचाऱ्यांची आर्थिक लूट होत आहे.

वेतनासाठी ५६ लाख रुपये जमा

या आंदोलनाची दखल घेत मनपाच्या नाशिक महानगर परिवहन महामंडळाने ठेकेदाराच्या खात्यात ३५० कर्मचाऱ्यांच्या वेतनाकरिता ५६ लाख रुपये वर्ग केले असून, येत्या दोन दिवसांत कर्मचाऱ्यांच्या खात्यात ऑक्टोबरचे वेतन जमा होणार आहे. तसेच नोव्हेंबर महिन्याचे वेतन १० डिसेंबरला अदा करण्यात येणार असल्याचे सिटीलिंकतर्फे सांगण्यात आले. कर्मचाऱ्यांना किमान वेतनानुसार कपात करून हातात १२ हजार ५०० रुपये वेतन पडत असले, तरी प्रत्यक्षात मात्र साडेनऊ ते दहा हजार इतकेच वेतन मिळत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : सिटीलिंक वाहकांच्या बोनसमधून राजकीय ठेकेदारांची 'दिवाळी' appeared first on पुढारी.