नाशिक : सिन्नरचे दोघे झाले पहिले सुपर रॅन्डोनिअर

सायकल राईड www.pudhari.news

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
600 किमीची बीआरएम सायकल राइड नितीन जाधव यांनी 37 तास 29 मिनिटांमध्ये व योगेश थोरात यांनी 39 तास 05  मिनिटांमध्ये पूर्ण करून सिन्नरचे पहिले एसआर होण्याचा मान मिळविला. 8 व 9 ऑक्टोबर रोजी बीआरएम 600 किमी सायकल राइडचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत लांब पल्ल्याच्या सायकलिंगचे लक्ष्य दिले जाते आणि ठरावीक वेळ मर्यादा ठेवून ते अंतर पार करणे अनिवार्य असते.

यात 200, 300, 400, 600 किमीच्या सायकलिंगच्या स्पर्धांचे आयोजन केले जाते. यासाठी वेगमर्यादा ठरवून दिलेल्या असतात. शिवाय आयोजकांकडून पॉइंट्सला काही वेळ मर्यादा आखून दिलेली असते. या वेळेत तिथे पोहोचणे आवश्यक असते. 600 किमी ला साधारणपणे दर 100 किमीवर एक चेक पॉइंट असतो. चारही स्पर्धा सायकलिस्टने एका वर्षात पूर्ण केल्या तर त्याला सुपर रॅन्डोनिअर (एसआर) असे संबोधले जाते. नाशिक सायकलिस्टने 8 व 9 ऑक्टोबरला 600 किमीच्या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत 21 सायकलिस्ट सहभागी झाले होते. 600 किमीसाठी वेळ मर्यादा 40 तास होती. या स्पर्धेतील नाशिक येथून निफाड, येवला, वैजापूर, गंगापूर मार्गे औरंगाबाद व नंतर सोलापूर हायवेवर बीडच्या पाडळसिगी टोलनाकाजवळ 300 किमी अंतर पूर्ण करून व पुन्हा त्याच मार्गे नाशिक असा 600 किमी पूर्ण करण्याचे आव्हान होते. सिन्नरमधून 600 किमी या सायकल चॅलेंजसाठी नितीन जाधव, योगेश थोरात यांनी 600 किमीची राइड पूर्ण केली. 200, 300, 400 किमी स्पर्धा नितीन जाधव व योगेश थोरात यांनी चालू वर्षात पूर्ण केल्या. 8 व 9 ऑक्टोबरला झालेली 600 किमीची राइड यशस्वीरीत्या पूर्ण करून सायकलिंग क्षेत्रातील सर्वात मानाचा सुपर रॅन्डोनिअर (एसआर) हा किताब मिळविला. तसेच सिन्नरमधून पाहिले सुपर रॅन्डोनिअर (एसआर) होण्याचा मान मिळविला. स्पर्धा यशस्वीतेसाठी नाशिक सायकलिस्टचे महेंद्र महाजन यांनी नियोजन केले. यशवंत मधोलकर यांनी मार्शलिंगचे काम बघितले.

600 किमीची बीआरएम सायकल राइडमध्ये 40 तास दिवस-रात्र सायकल चालविणे मोठे आव्हान होते. सिन्नरमधून आम्ही प्रथमच सायकलिंग क्षेत्रातील मोठ्या स्पर्धेत भाग घेऊन ही स्पर्धा पूर्ण केल्याचा आनंद आहे. सिन्नरमधून पहिले सुपर रॅन्डोनिअर होणे हा आमच्यासाठी अभिमान व गौरवाची बाब आहे. सिन्नरमधून यापुढे जास्तीत जास्त सायकलिस्ट बीआरएम स्पर्धेत सहभाग घेतील, अशी अपेक्षा आहेे. सायकलिंग आरोग्यासाठीही चांगली आहे. त्यामुळे दुहेरी फायदा होतो. – नितीन जाधव , अध्यक्ष सिन्नर सायकलिस्ट व स्पर्धक.

हेही वाचा:

The post नाशिक : सिन्नरचे दोघे झाले पहिले सुपर रॅन्डोनिअर appeared first on पुढारी.