नाशिक : सिन्नरला तीन धाडसी घरफोड्या

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
शहरातील शिंपी गल्ली व कमलनगर परिसरात घरफोडीच्या घटना घडल्या असून, चोरट्यांनी तब्बल 55 हजारांची रोकड व तब्बल 5 लाखांचे सोने लंपास केले. दिवसेंदिवस शहरात घरफोडीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली असून, चोरटे दिवसाढवळ्याही घरात घुसून चोरी करत आहे.

शिंपी गल्ली येथे राहणार्‍या अ‍ॅड. स्वाती श्रीराम क्षत्रिय (49) या रविवारी (दि.16) सकाळी कामानिमित्त बाहेर गेल्या असता अज्ञात चोरट्यांनी सकाळी 7.30 च्या सुमारास घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त करत कपाटाचे लॉक तोडून त्यांनी दागिने व रोकड लंपास केली. चोरट्यांनी कपाटातील 25 हजारांची रोकड, 1 ग्रॅमचे कानातले, 9 हजारांचे कानातले 8 जोड, 9 हजारांचे दोन झुबे, 9 हजारांचे दोन वेल, 15 हजारांची सोन्याची अंगठी, 18 हजारांच्या दोन अंगठ्या, 1 लाख 5 हजारांचे सोन्याचे बारीक बारीक तुकडे, 9 हजारांचे सोन्याचे मनी, 15 हजारांच्या चांदीच्या दोन निरंजनी, 2 कोयर्‍या, 6 वाट्या, दोन तांबे असा एकूण 2 लाख 23 हजारांचा मुद्देमाल लांबवला. यानंतर चोरट्यांनी क्षत्रिय यांच्या घराच्या वरती बांधकाम व्यावसायिक मनोज प्रतापराव देशमुख (34, रा. छत्रपती शिवाजी महाराज चौक) यांच्या कार्यालयाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कार्यालयात ठेवलेली 30 हजारांची रोकड घेऊन चोरट्यांनी तेथून पोबारा केला. घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच अ‍ॅड. क्षत्रिय यांनी लागलीच घराकडे धाव घेत बघितले सर्व दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आले. यानंतर वरच्या मजल्यावरील देशमुख यांचेही रोख रक्कम चोरीला गेल्याचे कळाले. सिन्नर पोलिसांना घटनेबाबत माहिती दिल्यानंतर पोलिस निरिक्षक संतोष मुटकुळे, सहायक पोलिस निरिक्षक विजय माळी, उपनिरिक्षक जाधव यांनी घयनास्थाळी येत पाहणी केली. अ‍ॅड. क्षत्रिय यांच्या फिर्यादीवरून सिन्नर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक जाधव करत आहेत.

तसेच तिसर्‍या घटना ही सरदवाडी रोड परिसरातील कमलनगर भागात घडली. याठिकाणी चोरट्यांनी 5 तोळ्यांचे दागिने लंपास केले. कमलनगर येथील हरिओम प्लाझामध्ये राहणारे ग्रामसेवक प्रशांतकुमार मधुसूदन भिसे (40) हे काही दिवसांपूर्वी गावी गेले होते. अज्ञात चोरट्यांनी संधी साधत रात्रीच्या वेळी दरावाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील साहित्य अस्ताव्यस्त करत कपाटात ठेवलेली अडीच तोळ्यांची सोन्याची चेन, 1 तोळ्याची अंगठी, दीड तोळ्याची सोन्याची अंगठी असा 5 तोळ्यांचा म्हणजेच जवळपास अडीच लाखांचा ऐवज चोरून चोरटे पसार झाले. दोन दिवसांनी भिसे घरी आले असता चोरीचा प्रकार लक्षात आला. त्यांनी सिन्नर पोलिस ठाण्यात माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. या प्रकरणी भिसे यांच्या फिर्यादीवरूनअज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलिस नाईक तांबडे करत आहेत.

दिवसाआड घरफोडीच्या घटनांनी रहिवाशांमध्ये भीती
शहरासह तालुक्यात दिवसाआड घरफोड्या होत असल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून सातत्याने दिसून येत आहे. शहरात तर दिवसाढवळ्या चोरटे घराचे कुलूप तोडून बिनधास्तपणे दागिने व रोकडवर हात साफ करत आहे. गेल्या महिनाभरात तालुक्यात तब्बल 12 ते 15 घरफोड्या झाल्या असून, पोलिसांचेही याकडे दुर्लक्ष होत आहे. अनेक घरफोड्यांचा तपास लागलेला नसताना कधी-कधी एकाच रात्री दोन-तीन घरफोड्या होत असल्याने चोर-पोलिस खेळ सुरू असून, बिनधास्त झालेले चोरटे पोलिसांनाच आव्हान देत असल्याचे जाणवत आहे. पोलिसांनी कठोर उपाययोजना आखून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : सिन्नरला तीन धाडसी घरफोड्या appeared first on पुढारी.