नाशिक : सिन्नरला भरदिवसा घरफोडी ; रोख 25 हजारांसह सात तोळे लंपास

घरफोडी www.pudhari.news

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा
शहरातील भैरवनाथ नगर परिसरातील संभाजीनगरमधील बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्याने कपाटातील रोख 25 हजारांसह सात तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना भरदुपारी बाराच्या सुमारास घडली.

मापारवाडी रस्त्यावरील संभाजीनगर येथे सूरज प्रकाश कडभाने हे पत्नी पूनम व लहान मुलीसह राहतात. पती-पत्नी दोघेही औद्योगिक वसाहतीतील कंपनीत नोकरीस आहेत. मंगळवारी सकाळी ते कामावर गेले. सूरज यांचे वडील प्रकाश कडभाने काही अंतरावरील रो-हाउसमध्ये राहतात. मुलीला आजोबांकडे सोडून पूनमदेखील सकाळी 9 च्या सुमारास कंपनीत गेल्या. मंगळवारी तळ्यातील भैरवनाथ मंदिरातील हरिनाम सप्ताहाची सांगता होती. त्यामुळे सकाळी 11 वा. प्रकाश कडभाने भैरवनाथ मंदिराकडे गेले. तेव्हा सूरज यांच्या घराला कुलूप होते. दुपारी एकच्या दरम्यान कडभाने मंदिरातून परत आले तेव्हा त्यांना घर उघडे दिसले. मात्र चोरीची पुसटशीही कल्पना आली नसल्याने ते घराच्या आवाराचे फाटक बंद करून राहत्या घराकडे निघून गेले. सायंकाळी पाचच्या सुमारास पूनम मुलीला घेऊन घरी गेल्या. तेव्हा घराचे दार उघडे दिसले. घरात शिरताच चोरीचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी भ्रमणध्वनीवरून सासर्‍यांना महिती दिली. चोरट्याने कपाटाचे कुलूप तोडून कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त फेकले होते. त्यात काहीही न सापडल्याने कपाटातील आतल्या कप्प्याचेही कुलूप त्यांनी तोडले. सूरज यांचा डीजे वाजवण्याचाही व्यवसाय असून, सोमवारी रात्री डीजेच्या सुपारीचे 25 हजार मिळाले होते ते त्यांनी कपाटाच्या आतल्या कप्प्यात ठेवले होते. ते चोरट्यांच्या हाती लागले. या कप्प्याच्या आत असलेला छोटा कप्पाही तोडत त्यात असलेले सात तोळ्यांचे सोन्याचे दागिने घेऊन चोरटे पसार झाले. कपाटाजवळ स्क्रू ड्रायव्हर व लोखंडी गज पडलेला आढळून आला. चोरीची माहिती मिळताच सिन्नर पोलिस ठाण्यातील कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. ठसेतज्ज्ञांच्या पथकानेही विविध ठिकाणचे काही ठसे मिळवले असल्याचे सांगण्यात येत आहे.

वर्दळीच्या रस्त्यालगतचे घर फोडले; पोलिसांसमोर आव्हान
कडभाने यांचे घर थेट मापारवाडीला जाणार्‍या रस्त्याच्या लगत असून, मंगळवारी सकाळपासूनच तळ्यातल्या भैरवनाथ मंदिराकडे जाणार्‍या भाविकांची गर्दी याच रस्त्याने जात होती. असे असताना दुपारी बाराच्या दरम्यान रस्त्यावरील या घरात चोरट्यांनी प्रवेश केला. चोरट्यांनी सीसीटीव्हीच्या वायर्स तोडून सर्व डाटा स्टोअर होणारा डीव्हीआर, एलईडी स्क्रीनही जाता जाता चोरटे घेऊन गेल्याने चोरांचा माग काढणेही अवघड बनले आहे. दिवसाढवळ्या भर रस्त्यावरील घरात चोरी करून चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान ठेवले आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : सिन्नरला भरदिवसा घरफोडी ; रोख 25 हजारांसह सात तोळे लंपास appeared first on पुढारी.