नाशिक : सिलिंडरच्या टंचाईने नांदगावकर हैराण

घरगुती गॅस सिलेंडर

नाशिक (नांदगाव) : पुढारी वृत्तसेवा
शहर व ग्रामीण भागातील रेस्टॉरंट, हॉटेल्समध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा सर्रास वापर केला जात आहे. नाश्ता सेंटर, चहा टपरी, खानावळ आदी ठिकाणीही घरगुती गॅस सिलिंडरचा वापर होत असल्याने घरगुती गॅस सिलिंडरची कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे.

गॅस सिलिंडर वेळेत उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. काळ्या बाजारात सर्रास विकले जाणारे घरगुती गॅस सिलिंडर आता सामान्यांच्या बजेटबाहेर गेले आहे. अच्छे दिनचे स्वप्न पाहिलेले गरीब व मध्यमवर्गीय कुटुंब आता स्वयंपाकासाठी जळाऊ लाकडांचा वापर करत आहेत. शहर व तालुक्यात हजारोंच्या संख्येने हॉटेल व खाद्यपदार्थविक्रेते असताना, व्यावसायिक गॅस घेणारे फक्त 105 ग्राहक आहेत. शहरातील भारत गॅस एजन्सीकडे फक्त 70 व्यावसायिकांची गॅससाठी नोंदणी झालेली आहे, तर एचपी गॅसकडे अवघे 35 ग्राहक आहेत. तालुक्यातील परमिटरूम, बिअरबार लहान-मोठे हॉटेल, रस्त्याच्या कडेला असलेल्या अमृततुल्य आदींसह अनेक ठिकाणी घरगुती गॅसचा खुलेआम वापर केला जात आहे. त्यांच्या वापरामुळे घरगुती गॅस सिलिंडरची टंचाई निर्माण झालेली आहे. मंगल कार्यालय, लॉन्स या ठिकाणीदेखील घरगुती गॅस सिलिंडरचा वापर होत आहे.

नाही गॅस पंप, पण वाहने गॅसवर सुसाट
वाहनांनाही घरगुती गॅस सिलिंडर सर्रास वापरले जाते. नांदगावात एकही गॅस पंप नाही, पण हजारो वाहने गॅसवर चालतात. त्यांना शहरात काळ्या बाजारातून एका ठिकाणाहून गॅस भरून दिला जातो. यावर प्रशासनाचे आणि पोलिसांचेही नियंत्रण नाही. घरगुती गॅस सिलिंडर व्यावसायिकांकडून होत असलेला वापर हा कुणाच्या तरी आश्रयाशिवाय शक्य आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : सिलिंडरच्या टंचाईने नांदगावकर हैराण appeared first on पुढारी.