नाशिक : सीएनजी कार खरेदीकडे पाठ; दर प्रतिकिलो 95 रुपये 90 पैसे

सीएनजी पीएनजी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
देशात पेट्रोल-डिझेलसारख्या पारंपरिक इंधनांचे दर सतत वाढत असल्याने, ग्राहकांकडून सीएनजी कार खरेदीला पसंती दिली जात होती. अद्याप पुरेसे सीएनजी पंप नसतानादेखील सीएनजी कारकडे ग्राहकांचा कल वाढत होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सीएनजीच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने, ग्राहकांनी आपला मोर्चा पुन्हा एकदा पेट्रोल कारकडेच वळविल्याचे चित्र सध्या बघावयास मिळत आहे.

सध्या नाशिकमध्ये पेट्रोल 106 रुपये 78 पैसे प्रतिलिटर मिळते, तर सीएनजी 95 रुपये 90 पैसे प्रतिकिलो मिळते. पेट्रोल आणि सीएनजीमध्ये जेमतेम 10 रुपयांचा फरक आहे. सीएनजीने नुकतेच डिझेलला ओव्हरटेक केले असून, ज्या गतीने दर वाढत आहेत, त्यावरून लवकरच सीएनजीचे दर पेट्रोललाही मागे टाकतील, अशी काहीशी स्थिती आहे. काही दिवसांपूर्वीच सीएनजीच्या दरात चार रुपयांनी वाढ केली होती. दरम्यान, सीएनजीच्या वाढत्या दरवाढीमुळे ग्राहकांकडून आता सीएनजी कार खरेदीकडे पाठ फिरवली जात असल्याचे चित्र आहे. कारण कार खरेदी करताना सीएनजी किट बसविल्यास कारच्या एकूण किमतीत तब्बल एक लाख रुपयांची वाढ होते. अशात ग्राहक सीएनजी कार खरेदी न करता, पेट्रोल कार खरेदीलाच प्राधान्य देत असल्याची बाब समोर येत आहे. वास्तविक, सीएनजी कारचे अनेक फायदे आहेत. मायलेज चांगला मिळत असल्याने, सीएनजी कार पेट्रोलच्या तुलनेत परवडते. मात्र, दरवाढीबरोबरच सीएनजी स्टेशनची कमतरता असल्याने, सीएनजी कार खरेदी करणे ही ग्राहकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यात दरवाढ होत असल्याने, ग्राहकांचा मनस्ताप वाढण्यात भरच पडताना दिसत आहे.

पॉवर आउटपूटवर परिणाम
दरवाढ, स्टेशनची कमतरता या कारणांमुळे सीएनजी कार खरेदीकडे ग्राहकांकडून पाठ फिरवली जात आहे. कारण अनेक शहरांमध्ये सीएनजी स्टेशन शोधणे अवघड होत आहे. याशिवाय कारमध्ये दीर्घकाळ सीएनजी वापरल्याने, वाहनांच्या परफॉर्मन्सवरही परिणाम होतो. पेट्रोल-डिझेल कार वापरताना जितका आउटपूट असतो, त्या तुलनेत सीएनजीमुळे पॉवर आउटपूट 10 टक्क्यांनी कमी होऊ शकते.

The post नाशिक : सीएनजी कार खरेदीकडे पाठ; दर प्रतिकिलो 95 रुपये 90 पैसे appeared first on पुढारी.