नाशिक : सुधारित आणेवारीत सर्व गावे 50 पैशांवर

शेतकरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा प्रशासनाने आणेवारी अंतर्गत जिल्ह्यातील एक हजार 962 गावांची पैसेवारी घोषित केली आहे. त्यामध्ये खरीप व रब्बी हंगामातील दोन्ही गावांची आणेवारी 50 पैशांवर असल्याने जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती नसेल. दरम्यान, डिसेंबरमध्ये महिन्यात अंतिम आणेवारी घोषित केली जाईल.

जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाला आहे. अनेक तालुक्यांमध्ये प्रमाणापेक्षा अधिक पर्जन्याची नोंद झाली. त्यामुळे मुबलक पाणीसाठा निर्माण झाला असताना पिकांना फटका बसला आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासन दरवर्षी गावनिहाय ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरअखेर अनुक्रमे नजर, सुधारित तसेच अंतिम आणेवारी घोषित करते. या माध्यमातून पिकांचा अंदाज, उत्पादन तसेच कोठे दुष्काळी परिस्थिती असल्यास उपाययोजना करण्याबाबत ठरविले जाते. त्यानुसार प्रशासनाने सुधारित आणेवारी घोषित केली आहे. तसेच जिल्हा प्रशासनाने त्याचा अहवाल विभागीय आयुक्तालयाला सादर केला आहे.

अतिवृष्टी व ढगफुटीसदृश पावसाने जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनस्तरावरून तातडीने मदत देण्याची मागणी होत आहे. परंतु, पीक आणेवारीत सर्व गावे 50 पैशांवर असल्याने दुष्काळी मदत व पीकविमा मिळण्यास शेतकर्‍यांना अनेक अडचणी येऊ शकतात.

जिल्ह्यातील 1 हजार 962 गावांचा आढावा
जिल्ह्यातील एकूण 1 हजार 962 गावांपैकी खरिपाचे 1 हजार 679 तसेच रब्बीच्या 283 गावांचा आढावा घेण्यात आला. या आढाव्यावेळी एकाही गावांची आणेवारी 50 पैशांच्या आत नसल्याचे समोर आले. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीचे चित्र नसणार आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : सुधारित आणेवारीत सर्व गावे 50 पैशांवर appeared first on पुढारी.