नाशिक : सुरळीत विजेसाठी शेतकर्‍यांचा ठिय्या; अन्यथा मरणाची परवानगी द्या

कळवण www.pudhari.news

नाशिक (कळवण) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील दह्याणे, बार्डे, चिंचपाडा, हिंगवे, गोपाळखडी, ढेकाळे, बालापूर, जामले, पाळे आदी गावांतील वीजपुरवठा सुरळीत करावा अन्यथा मरण्याची परवानगी द्या, अशी मागणी आंदोलक शेतकर्‍यांनी महावितरण कंपनी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.

यावेळी सहायक अभियंता नितीन आंबडकर यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, शिंदे-भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून शेतकर्‍यांना दिवसा आठवड्यातून चार दिवस आठ तास पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु कळवण तालुक्यात सध्या कांदा लागवडीचे काम सुरू असताना महावितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित करून शेतकर्‍यांना झटका दिला आहे. त्यामुळे तालुक्यातील दह्याणे, बार्डे, चिंचपाडा, हिंगवे, गोपाळखडी, ढेकाळे, बालापूर, जामले, पाळे आदी गावांतील शेतकर्‍यांनी मंगळवारी (दि. 27) कळवण येथील महावितरण कंपनीचे कार्यालय गाठत ठिय्या आंदोलन केले. अतिवृष्टीतही शेतकर्‍यांनी स्वतःचे कसब वापरून कशीबशी पिके वाचविली. परंतु त्या मालाला आता कवडीमोल भाव मिळत आहे. आता गावठी कांदा लागवड सुरू आहे. वीजपुरवठा वारंवार खंडित केला जात असल्याने शेती कठीण झाली असून शेतकरी मेटाकुटीस आला आहे. आम्हाला पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा द्या अन्यथा मरण्याची परवानगी द्या, असा टाहो शेतकर्‍यांनी फोडला. विजेपासून वंचित असलेल्या वरील गावांना दोन दिवसांत तत्काळ पूर्ण क्षमतेने आठ तास वीजपुरवठा द्यावा अन्यथा महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचाही इशारा निवेदनाद्वारे महावितरण कंपनीचे सहायक अभियंता नितीन आंबडकर यांना दिला आहे. यावेळी शेतकरी भरत शिंदे, पोपटराव वाघ, रवींद्र पगार, सुदाम बागूल, भिका बागूल, राजाराम बागूल. मोतीराम पवार, युवराज गावित, रामदास बोरसे, उत्तम बागूल, भगवान बागूल, मधुकर बागूल, विष्णू पवार, रामचंद्र बागूल, काशीनाथ गायकवाड, हिरामण बहिरम, विलास पालवी आदींसह शेतकरी संख्येने उपस्थित होते.

आम्ही नियमित वीजबिल भरणारे शेतकरी आहोत. कांदा लागवड सुरू असताना रोपांना पाणी देणे गरजेचे आहे. रात्री – अपरात्री केव्हा तरी एक – दोन तास वीजपुरवठा होत आहे. संपूर्ण रात्र जागून पिकांना पाणी देणे सुरू आहे. त्यात भरणे होत नसल्याने नुकसान होत आहे, तर पूर्ण क्षमतेने दिवसा आठ तास वीजपुरवठा करावा. -भरत शिंदे, शेतकरी, हिंगवे.

हेही वाचा:

The post नाशिक : सुरळीत विजेसाठी शेतकर्‍यांचा ठिय्या; अन्यथा मरणाची परवानगी द्या appeared first on पुढारी.