नाशिक : सेवा पंधरवड्यासाठी कार्यकर्त्यांनी काम करावे : डॉ. विजयकुमार गावित

देवळा www.pudhari.news

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा
केंद्र शासनाच्या विविध योजना तळागाळातील गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा कार्यक्रम 100 टक्के यशस्वी करण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी झोकून द्यावे, असे आवाहन आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी शनिवारी (दि. 17) येथे केले.

येथे सेवा पंधरवडा कार्यक्रमानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ना. डॉ. गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत रक्तदान शिबिर, कोविड बूस्टर डोस, सफाई कामगारांना कपडेवाटप, वृद्धांना काठीवाटप आदी कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ. राहुल आहेर, भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर उपस्थित होते. ना. डॉ. गावित म्हणाले की, सेवा पंधरवडा कार्यक्रमानिमित्त केंद्र शासनाच्या विविध योजना ग्रामीण भागातील जनतेपर्यंत 100 टक्के पोहोचवण्यासाठी लाभार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज भरून घेणे, त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी या काळात आपल्याला काम करायचे आहे. अनेक लाभार्थी हे अद्याप योजनांपासून वंचित आहेत. त्यांना शोधून त्यांना सेवा कशी देता येईल, यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी स्वत:ला झोकून द्यावे. ना. डॉ. गावित यांचे देवळा शहरात आगमन होताच त्यांचे पाचकंदील परिसरात ढोल – ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर ना. डॉ. गावित यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. उपनगराध्यक्ष जितेंद्र आहेर, तालुकाध्यक्ष किशोर चव्हाण, शहराध्यक्ष अतुल पवार यांच्या हस्ते ना. डॉ. गावित यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष एन. डी. गावित, नगरसेवक मनोज आहेर, अशोक आहेर, कैलास पवार, रोशन अलिटकर, नानू आहेर, किशोर आहेर, संजय कानडे, उपसरपंच नदीश थोरात ,योगेश वाघमारे, भारत कोठावदे, तहसीलदार विजय सूर्यवंशी, गटविकास अधिकारी राजेश देशमुख आदी उपस्थित होते. तालुकाध्यक्ष किशोर चव्हाण यांनी आभार मानले.

हेही वाचा:

The post नाशिक : सेवा पंधरवड्यासाठी कार्यकर्त्यांनी काम करावे : डॉ. विजयकुमार गावित appeared first on पुढारी.