नाशिक : सोशल मीडियावरील मैत्रिणीने लावला २४ लाखांचा चुना

फसवणूक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

लग्न जुळविणाऱ्या संकेतस्थळावर ओळख झालेल्या महिलेने शहरातील ५२ वर्षीय व्यक्तीस ३४ लाख २५ हजार ३०० रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. जानेवारी ते मार्च महिन्यात हा प्रकार घडला असून, त्या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात भामट्यांविरोधात फसवणुकीसह माहिती-तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एन. टी. भामरे (रा. गंगापूर रोड) यांच्या फिर्यादीनुसार, विवाह जुळविण्याच्या संकेतस्थळावरून त्यांची उषा कडक सिंग हिच्याशी ओळख झाली होती. उषाने ब्रिटनमध्ये राहत असल्याचे सांगत भामरे यांच्याशी व्हाॅट्सअप, मेलवरून संपर्क साधण्यास सुरुवात केली. दरम्यान, संशयित उषा हिने आपल्याला महाराष्ट्रात व्यवसाय सुरू करायचा असल्याचे भामरे यांना सांगितले. उषाने ब्रिटनहून वस्तू पाठविली, मात्र ती कस्टमच्या कचाट्यात अडकल्याचे सांगत ती सोडविण्यासाठी उषाने भामरे यांच्याकडे आर्थिक मदत मागितली. भामरे यांनी मदत केली, कालांतराने उषाने भामरे यांना त्यांचे पैसे परत केले. दरम्यान, उषाने भारतात येत असल्याचे भामरे यांना सांगितले. त्यानंतर भारतात आल्यावर आपण इमिग्रेशन विभागाच्या ताब्यात असल्याचे उषाने भामरे यांना सांगितले. तिच्याकडे पाउंडमध्ये परकीय चलन असून, ते याठिकाणी चालत नाही.

त्यामुळे भारतीय व्यक्तीच्या बँक खात्याची आवश्यकता असल्याचे सांगत तिने पुन्हा भामरे यांच्याकडे त्यांच्या बँक खात्याची माहिती मागितली. त्यानुसार भामरे यांनी उषाला मदतीस होकार दिला. उषाने भामरे यांना त्यांच्या बँक खात्यातील ३४ लाख २५ हजार ३०० रुपयांची रक्कम इतर बँक खात्यात भरण्यास भाग पाडून भामरे यांची फसवणूक केली. त्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर भामरे यांनी सायबर पोलिसांशी संपर्क साधून फिर्याद दाखल केली आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : सोशल मीडियावरील मैत्रिणीने लावला २४ लाखांचा चुना appeared first on पुढारी.