नाशिक : स्टीलच्या दरात 24 हजारांची घसरण; बांधकाम व्यावसायिकांना दिलासा

स्टील www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
तीन ते चार महिन्यांपूर्वी घाऊक बाजारात स्टीलचे दर 75 ते 80 हजार टनापर्यंत गेल्याने बांधकाम व्यावसायिकांसह लघुउद्योजक संकटात सापडला होता. आता मात्र, स्टीलच्या दरात विक्रमी 24 हजारांनी घसरण झाली असून, स्टीलचे दर 48 हजारांवर आले आहेत. त्यामुळे लघुउद्योजकांसह बांधकाम व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. घटलेली मागणी, राज्य सरकारकडून विजेची न मिळालेली सबसिडी, फ्युअल टॅक्स आणि इम्पोर्ट ड्यूटी आदी कारणांमुळे दरात घसरण झाल्याचे सांगितले जात आहे.

नाशिकसह राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये विदर्भ आणि जालन्यातील स्टील उद्योगांकडून स्टीलचा पुरवठा केला जातो. कोरोनाच्या संकटात दोन वर्षे बांधकाम व्यवसाय थंडावला होता. मोठमोठे प्रकल्प बंद पडल्याने, कोरोनाच्या संकटानंतर पुन्हा एकदा बांधकाम व्यवसाय झेप घेईल, अशी चिन्हे होती. परंतु यंदा पावसाळा चांगलाच लांबल्याने, त्यांचा मोठा परिणाम बांधकाम क्षेत्रावर झाला. सततच्या पावसामुळे अनेक बांधकाम प्रकल्प रखडले. याचा परिणाम घरबांधणीसाठी लागणार्‍या स्टील अर्थात लोखंडी सळ्यांच्या उत्पादनावर झाला आहे. मोठी गुंतवणूक करून काही स्टील उद्योजकांनी मागणीपूर्व काही टनांमध्ये उत्पादन करून त्याची साठवणूक केली होती. मात्र, याचा स्टील उद्योजकांना फारसा फायदा झाला नसल्याचे दिसून येत आहे. कारण स्टीलची मागणीच घटल्याने, साठवणूक केलेला स्टील आता बेभाव विकण्याची वेळ स्टील उद्योजकांवर आल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, तीन ते चार महिन्यांपूर्वी घाऊक बाजारात स्टीलचे दर 75 ते 80 हजार रुपये टनापर्यंत गेले होते. कधीकाळी 45 हजार टनापर्यंत मिळणार्‍या स्टीलमध्ये अचानकच 85 ते 90 टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याने, बांधकाम व्यावसायिक हादरले होते. अनेकांनी घरांच्या किमती वाढविल्या होत्या. आता पुन्हा एकदा स्टीलचे दर कमी झाल्याने, घरांच्या किमती कमी होणार काय हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सबसिडी नाहीच…
स्टील उद्योगाला चालना देण्यासाठी विदर्भ तसेच मराठवाड्यातील उद्योगांना विजेच्या दरात सबसिडी दिली होती. मात्र, ही सबसिडी अद्यापपर्यंत उद्योजकांना मिळालेली नाही. त्यातच राज्यात सत्ताबदल झाल्याने, नव्या सरकारकडूनदेखील सबसिडीबाबत कोणतीच पावले उचलली नसल्याने, स्टील उद्योजक त्रस्त झाले आहेत. शेजारील राज्य असलेल्या मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या तुलनेत महाराष्ट्रात विजेचे दर अधिक असल्याने, विजेच्या दरात सबसिडी द्यावी, अशी मागणी उद्योजकांची होती. मात्र, अजूनही सबसिडीची प्रतीक्षा कायम आहे.

20 ते 25 टक्क्यांनी उत्पादन घटविले…
स्टीलची मागणी मोठ्या प्रमाणात घटल्याने स्टील उत्पादकांनी 20 ते 25 टक्क्यांनी स्टीलचे उत्पादन घटविले आहे. कारण नेहमीच्या प्रमाणात उत्पादन सुरू ठेवल्यास, त्याचा साठा कुठे ठेवावा असा प्रश्न उद्योजकांना सतावत आहे. त्याचबरोबर दर कमी झाल्यानेही स्टील उद्योजकांना चांगला फटका बसला आहे. शिवाय तीन महिन्यांपूर्वी सर्व करांसहीत 90 हजार प्रतिटनावर पोहोचलेले दर आता चक्क 48 हजारांवर आल्याने, स्टील उत्पादक अडचणीत सापडताना दिसत आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : स्टीलच्या दरात 24 हजारांची घसरण; बांधकाम व्यावसायिकांना दिलासा appeared first on पुढारी.