नाशिक : स्वतःच्या अपघातानंतर बनवलं ‘स्मार्ट हेल्मेट’, अशी आहे खासियत

स्मार्ट हेल्मेट,www.pudhari.news

नाशिक : गणेश सोनवणे

मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या अंतिम वर्षातील विद्युत विभागाच्या विद्यार्थ्यांनी एक अनोखे स्मार्ट हेल्मेट तयार केले आहे. या हेल्मेट मध्ये अनेक स्मार्ट फिचर्स असून ते दुचाकी चालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरेल.

तुलनेने दुचाकी वापरणाऱ्यांचे प्रमाण आपल्याकडे अधिक आहे. त्यात गेल्या काही वर्षापासून अपघातांची आकडेवारी बघता डुलकी लागल्याने, मद्य प्राशन कल्याने व वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे दुचाकी अपघाताचे प्रमाण सर्वांधिक नोंदविण्यात आले आहे. तसेच यात मृत्यूचे व कायमस्वरूपी अपंगत्वाचे प्रमाणही अधिक असल्याचे निष्पन्न झाले आहे. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून विद्युत विभागातील अंतिम वर्षातील विद्यार्थी सायली गटकळ, सोनाली बेडसे व संचित निरगुडे यांनी स्मार्ट हेल्मेट बनविले आहे.

या हेल्मेटची खास वैशिष्य अशी…

चालकाने स्मार्ट हेल्मेट न घातल्यास किंवा मद्यपान करून वाहन चालवण्याचा प्रयत्न केल्यास वाहन सुरुच होत नाही. तसेच वाहन चालवताला झोप लागत असल्यास किंवा डुलकी लागल्यास चालकास स्मार्ट हेल्मेट अलार्म देते व काही वेळाने वाहन आपोआप थांबविते. त्यासाठी या हेल्मेटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तीन सेन्सर बसविण्यात आले आहेत. सर्वसामन्य लोकांना परवडेल अशा किंमतीची ही सेन्सर आहेत. हे हेल्मेट बनविण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागला आहे.

अशी सूचली कल्पना…

मी एकदा विना हेल्मेट गाडी चालवत असताना माझी गाडी स्पीड ब्रेकरवर जाऊन जोऱ्यात आदळली. त्यावेळी मला दुखापतही झाली. हा अपघात किरकोळ असला तरी त्यातूनच मला स्मार्ट हेल्मेटची कल्पना सुचली. त्यानंतर आम्ही स्मार्ट हेल्मेटच्या प्रोजेक्टसाठी काम सुरु केलं. सहा महिन्यांत आम्ही हा प्रोजेक्ट पूर्ण केला.
– सोनाली बेडसे, विद्यार्थीनी

हे स्मार्ट हेल्मेट वापरात आल्यास दुचाकी अपघाताचे प्रमाण कमी होऊन अधिका-अधिक दुचाकी चालकांचे प्राण वाचतील असा विश्वास या विद्यार्थ्यांना आहे. त्यादृष्टीने आम्ही प्रयत्न करणार असून एखाद्या कंपनीला आमची ही कल्पना आवडल्यास व त्यादृष्टीने सहकार्य मिळाल्यास आम्हाला हे स्मार्ट हेल्मेट लॉन्च करायला आवडेल अशी भावना या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. या प्रोजक्टसाठी विद्यार्थ्यांना विभागप्रमुख डॉ. डी. पी कदम यांचे मागदर्शन लाभले. तसेच प्राचार्य डॉ. वी.पी. वाणी व महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. शेफाली भुजबळ यांनी प्रोत्साहन देऊन कौतुक केले.

हेही वाचा :

The post नाशिक : स्वतःच्या अपघातानंतर बनवलं 'स्मार्ट हेल्मेट', अशी आहे खासियत appeared first on पुढारी.