नाशिक : स्वस्तात फ्लॅट देण्याच्या बहाण्याने सहा जणांना गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

स्वस्तात फ्लॅट देतो, असे सांगून एक भामट्याने सहा जणांना सुमारे ६५ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात भूषण रमेश वरखेडे यांनी संशयित नील राजेंद्रभाई ठाकूर (२८, रा. मूळ रा. सुरत, राज्य गुजरात, हल्ली रा. पाथर्डी फाटा, नाशिक) याच्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे.

भूषण वरखेडे (२९, रा. प्रशांतनगर, पाथर्डी फाटा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते पाथर्डी फाटा परिसरात नव्याने सुरू असलेल्या इमारतीत घर विकत घेण्यासाठी प्रयत्नशील होते. ऑक्टोबर २०२१ मध्ये त्यांची ओळख संशयित नील ठाकूर सोबत झाली. नीलने दिलेल्या माहितीनुसार, बांधकाम व्यावसायिक अरविंदभाई राखोलिया हे नातलग असून, त्यांचे दामोदरनगर येथे बांधकाम सुरू आहे. तेथे स्वस्तात फ्लॅट देतो असे नीलने सांगितले. त्यामुळे भूषण यांनी संबंधित फ्लॅटची पाहणी करून त्यापैकी एक फ्लॅट घेण्याची तयारी दर्शवली. नीलसोबत बोलणे झाल्यानंतर भूषण यांनी टोकन स्वरूपात नीलला ५० हजार रुपये दिले. त्यानंतर वेळोवेळी डिसेंबर २०२२ पर्यंत भूषण यांनी नीलला ऑनलाइन व रोख स्वरूपात १४ लाख दोन हजार ३४० रुपये दिले. मात्र या व्यवहारांची कोणतीही नोंद नीलने केली नाही. दरम्यान, आपल्याला फ्लॅटचे खरेदीखत करायचे आहे असे नीलने सांगितले. मात्र, त्यानंतर भूषण यांचा नीलसोबत संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे भूषण यांनी बांधकाम व्यावसायिक राखोलिया यांच्या कार्यालयात जाऊन चौकशी केली असता नील हा राखोलिया यांचा नातलग नसल्याचे समजले. तसेच तो काही दिवस राखोलिया यांच्याकडे कामास होता.

दरम्यान, अधिक चौकशीत नील याने भूषण यांच्याप्रमाणेच अनिल सदाशिव वाणी (रा. जळगाव), मनीषा विजय सोनवणे (रा. कल्याण), नितीन बाळकृष्ण दंडगव्हाळ (रा. गणेशचौक, सिडको), समाधान बाळू पाटील (रा. जळगाव) व नयना प्रवीण रणदिवे (रा. जळगाव) यांना गंडा घातल्याचे समोर आले. त्यामुळे या व्यक्तींनी इंदिरानगर पोलिसांकडे तक्रार अर्ज केला होता. अर्जाची प्राथमिक चौकशी करून पोलिसांनी नीलविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

भूषण वरखेडे यांना १४,०२,३४० रुपये, अनिल सदाशिव वाणी यांना १३ लाख ५० हजार रुपये, मनीषा विजय सोनवणे यांना ५१ हजार रुपये, नितीन बाळकृष्ण दंडगव्हाळ यांना ५० हजार रुपये, समाधान बाळूु पाटील यांना १९,०६,००० रुपये व व नयना प्रवीण रणदिवे यांना १७,२३,००० रुपयांना संशयित नीलने गंडा घातला आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : स्वस्तात फ्लॅट देण्याच्या बहाण्याने सहा जणांना गंडा appeared first on पुढारी.