नाशिक : स्वातंत्र्यसैनिकांप्रति कृतज्ञता व्यक्त करावी : राधाकृष्ण गमे

हेरीटेज वॉक www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत असताना देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या जिवाचे बलिदान दिलेल्या सैनिकांचे योगदान फार मोलाचे आहे. वीर जवान व स्वातंत्र्यसैनिकांप्रती कृतज्ञता व सार्थ अभिमान व्यक्त करत आपण सर्व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करूया, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले.

अमृत महोत्सवनिमित्ताने दिंडोरी तहसील प्रशासनातर्फे ऐतिहासिक, पौराणिक वारसास्थळ असलेल्या रामशेज किल्लावर शनिवारी (दि.6) हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आयुक्त गमे बोलत होते. व्यासपीठावर जिल्हाधिकारी गंगाथरन डी., अपर आयुक्त भानुदास पालवे उपस्थित होते. राधाकृष्ण गमे म्हणाले की, आजादी का अमृत महोत्सवनिमित्ताने रामशेज किल्ला हेरिटेज वॉकचे आयोजन केले आहे. पौराणिक व ऐतिहासिक वारसास्थळ असलेल्या या किल्ल्याच्या ठिकाणी हा कार्यक्रम अयोजित केल्याबद्दल गमे यांनी दिंडोरी तालुका प्रशासनाचे आभार मानले. जिल्हाधिकारी गंगाथरन डी. म्हणाले, 13 ते 15 ऑगस्ट कालावधीत ‘हर घर तिरंगा’ अभियान राबवत आहोत. यामध्ये सर्व नागरिकांनी उत्साहाने सहभागी होरात प्रत्येक घराघरात राष्ट्रध्वज उभारावा, असे आवाहन त्यांनी केले. रामशेज किल्ल्याच्या पायथ्याशी 75 वड व पिंपळ रोपांची लागवड मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. दिंडोरीचे प्रांत संदीप आहेर यांनी प्रास्ताविक केले. प्रवीण दळवी यांनी रामशेज किल्ल्याची ऐतिहासिक माहिती उपस्थितांना दिली. याप्रसंगी उपआयुक्त रमेश काळे, उपजिल्हाधिकारी नितीनकुमार मुंडावरे, निफाड प्रांत डॉ. अर्चना पठारे, बागलाण प्रांत बबन काकडे, दिंडोरीचे तहसीलदार पंकज पवार यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते.

वारसांचा सत्कार
स्वातंत्र्यसैनिक दिवंगत रंगनाथ चित्ते यांच्या वीरपत्नी चंद्रभागा चित्ते आणि स्वातंत्र्यसैनिक दिवंगत भाऊसाहेब मिसाळ यांचे चिरंजीव मधुकर मिसाळ या वारसांचा सत्कार विभागीय आयुक्त गमे यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला.

हेही वाचा:

The post नाशिक : स्वातंत्र्यसैनिकांप्रति कृतज्ञता व्यक्त करावी : राधाकृष्ण गमे appeared first on पुढारी.