नाशिक : स्वातंत्र्यासाठी योगदान नाही त्यांच्याच हाती सत्ता – नाना पटोले

सिडको/नाशिक : पुढारी वृत्तसेवा
भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी काँग्रेसचे मोठे योगदान आहे. मात्र आता ज्यांचा स्वातंत्र्यामध्ये सहभाग नव्हता, असे लोक केंद्राच्या सत्तेत बसून देश चालवत आहेत. यासाठी देशाचे संविधान, लोकशाही व स्वातंत्र्य कायम राहावे, ही भूमिका जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आजादी गौरव यात्रेच्या माध्यमातून केला जात असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नाशिक शहर काँग्रेसच्या वतीने पाथर्डी फाटा येथून आजादी गौरव पदयात्रेला आ. पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते.

प्रारंभी पाथर्डी फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला आ. पटोले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पदयात्रेचा प्रारंभ करण्यात आला. भर पावसात सुरू झालेली ही पदयात्रा सिम्बायोसिस कॉलेज, महाजननगर, उत्तमनगर, पवननगर, रायगड चौक, सावतानगर, त्रिमूर्ती चौक, दत्त मंदिर, उंटवाडी मार्गे संभाजी चौकात या पदयात्रेची सांगता करण्यात आली. यावेळी परिसरातील चौकाचौकांत प्रदेशाध्यक्ष पटोले यांचे औक्षण करण्यात आले, तर गौरव पदयात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.

या पदयात्रेत माजी आरोग्य राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव, आमदार हिरामण खोसकर, शहराध्यक्ष शरद आहेर, वत्सला खैरे, दिगंबर गिते, माजी नगरसेवक अण्णा पाटील, डॉ. सुभाष देवरे, लक्ष्मण जायभावे, सिडको ब्लॉक अध्यक्ष विजय पाटील, डॉ. सुचेता बच्छाव, मुन्ना ठाकूर, धोंडीराम बोडके, नाना भामरे, मीरा साबळे, भरत पाटील, देवा देशपांडे, इम—ान अन्सारी, कैलास कडलग आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

हेही वाचा :

The post नाशिक : स्वातंत्र्यासाठी योगदान नाही त्यांच्याच हाती सत्ता - नाना पटोले appeared first on पुढारी.