नाशिक : हंडाभर पाण्यासाठी होतेय भटकंती

चांदवड www.pudhari.news

नाशिक (चांदवड) : सुनील थोरे

तालुक्याच्या पूर्व भागातील दरेगाव परिसरातील विहिरी, बोअरवेल यांनी तळ गाठल्याने हंडाभर पिण्याच्या पाण्यासाठी गावकऱ्यांना दारोदार भटकंती करावी लागत आहे. यासाठी पिण्याच्या पाण्याचे टॅंकर सुरू करण्याची मागणी गटविकास अधिकारी यांच्याकडे महिनाभरापूर्वी केली आहे. मात्र, तरीही अद्याप टॅंकर सुरू न झाल्याने संतप्त गावकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

चांदवड तालुक्यातील दरेगाव येथे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, गावातील महिलांना पाण्यासाठी इतरत्र वणवण दूरवर भटकत फिरावे लागत आहे. विशेषत: गावात राहणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जटिल बनला असून, गावासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी, बोअरवेल, हातपंप यांना पाणी राहिले नसल्याने गंभीर परिस्थिती उद्भवली आहे. दरेगाव ग्रामपंचायतीने टँकर सुरू करावा, असा प्रस्ताव चांदवड पंचायत समितीकडे देऊन तब्बल तीन आठवडे उलटले आहेत. मात्र, तरीही प्रशासनाकडून पाण्याचा टँकर सुरू करण्याबाबत कोणत्याही हालचाली दिसून येत नाही. यामुळे दिवसेंदिवस शासनाप्रती नागरिकांचा रोष वाढत आहे. टँकर सुरू झाला नाही तर ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा महिलांनी दिला आहे.

दरेगाव येथे पाण्याचा टँकर सुरू करण्याचा प्रस्ताव आला आहे. या प्रस्तावाची दखल घेत गावात जाऊन पाहणी करीत तहसीलदार यांच्याकडे कागदपत्रे पाठवली आहेत. लवकरच दरेगावात पाण्याचा टँकर सुरू करण्यात येईल. – महेश पाटील, गटविकास अधिकारी.

दरेगाव ग्रामपंचायतीची आर्थिक परिस्थिती नसल्याने पाणी विकत घेऊन नागरिकांना पुरवणे अशक्य आहे. यासाठी शासनानेच त्वरित टँकर सुरू करण्याची मागणी सरपंच सरला पवार, ग्रामपंचायत सदस्य संजय जाधव, ग्रामपंचायत सदस्य वैशाली देवरे व गावातील नागरिकांनी केली आहे. कडक उन्हाळा सुरू होताच जमिनीतील पाणीपातळी खालावली आहे. पर्यायाने पाण्याचे स्त्रोत असलेल्या विहिरी, बोअरवेल कोरडे पडण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करण्याचे प्रस्ताव प्रशासनाकडे प्राप्त होत आहेत. तालुक्यातील दरेगाव, नांदूरटेक, कातरवाडी येथे टँकर सुरू करण्याची मागणी सध्या जोर धरू लागली आहे.

दरेगाव येथील भूपृष्ठ उंचसखल असल्याने जमिनीतील पाणी टिकून राहत नाही. यासाठी शासनाने पिण्याच्या पाण्याची समस्या कायमची सोडवण्यासाठी शाश्वत उपाययोजना करणे आवश्यक आहे. – वैशाली देवरे, ग्रामपंचायत सदस्या.

हेही वाचा:

The post नाशिक : हंडाभर पाण्यासाठी होतेय भटकंती appeared first on पुढारी.