नाशिक : हक्काच्या वन जमिनींसाठी पुन्हा लाॅंग मार्च काढणार : जे. पी. गावित यांची माहिती

सुरगाणा, www.pudhari.news

सुरगाणा (जि. नाशिक) : प्रतिनिधी

हक्काच्या वन जमिनींसाठी पुनश्च २०१८ च्या लाॅंग मार्चची पुनरावृत्ती करणार असे प्रतिपादन माजी आमदार जे.पी.गावित यांनी सुरगाणा येथे माकप कार्यालयात आयोजित सुरगाणा तालुका माकप सरपंच परिषदेच्या आयोजित बैठकीत केले. यावेळी व्यासपीठावर  सरपंच परिषदेचे अध्यक्ष हिरामण गावित अलंगुण, उपाध्यक्ष सदूकी बागुल चिकाडी, सेक्रेटरी कैलास भोये लाडगाव, खजिनदार रोहिणी वाघेरे, किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष मोहन जाधव, कार्याध्यक्ष सावळाराम पवार, जिल्हा सेक्रेटरी रमेश चौधरी, खजिनदार सुभाष चौधरी, चांदवडचे हनुमंत गुंजाळ, पेठ चे देवराम गायकवाड, नांदगावचे धर्मराज शिंदे आदी २३ मार्च मुंबई विधानभवनावर आयोजित लाॅंग मार्चच्या नियोजन बैठकीस उपस्थित होते. यावेळी २३ मार्च च्या मुंबई मोर्चाची रणनीती आखण्यात आली.

यावेळी माजी आमदार जे. पी. गावित यांनी भाजपा, शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. शेतक-यांना खोटी आश्वासने देत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे विधानसभेत खोटी आश्वासने देत आहेत. येत्या २३ मार्च ला मुंबई मंत्रालयावर पुनःश्च एकदा आरपारची लढाई करीत ६ मार्च २०१८ ला झालेल्या लाॅंग मार्चची पुनरावृत्ती करत महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना सोबत घेऊन मंत्रालयावर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. यामध्ये वन जमिनीच्या प्रश्ना बरोबरच वीज, रस्ता, पाणी, आरोग्य, शिक्षण, दळणवळण, घरकुल योजना, जूनी पेन्शन योजना, वृद्धापकाळ, निराधार, संजय गांधी योजने करीता २१ हजार आतील उत्पन्नाचा दाखला, कांदा, कापूस, सोयाबीन, धान शेतकरी उत्पादक मालाला भाव मिळायला पाहिजे यासाठी मोठे आंदोलन उभारले जाणार आहे. हक्काच्या वन जमिनीच्या लढाई साठी नाशिक जिल्ह्याबरोबरच राज्यातील गोरगरीब, दलित, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, कामगार, सरकारी कर्मचारी, जूनी पेन्शन योजना, कोलमोडलेली आरोग्य सेवा, अंगणवाडी मानधन वाढ, पेन्शन योजना, आशा पोलीस पाटील मानधन वाढ, नुकसानभरपाई या प्रश्नासाठी किसान सभा, माकप तर्फे सरकार विरोधी तीव्र आंदोलन छेडले जाणार आहे.

केंद्रात अथवा राज्यात कोणतेही सरकार असो ते गेंड्याचे कातडीचे असते त्याला जाग आणण्यासाठी देशाच्या, राज्याच्या राजधानीत प्रचंड मोठे आंदोलन केले तरच जाग येते. आता सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाकडे सरकार डोळे झाक करीत आहे. आता रस्त्यावर उतरून लढाई करीत आपली एकजूट दाखविण्याची गरज निर्माण झाली असल्याचे गावीत म्हणाले.  शेतक-यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपली ताकत दाखविण्यासाठी एकजूट महत्त्वाची आहे. त्यासाठी स्वतःला झोकून दिले पाहिजे. आदिवासी शेतकरी कसत असलेली जमीन नावावर झाली पाहिजे. ३ गुंठे किंवा अर्धा एकर जमीन देत तोंडाला पाने पुसली आहेत. तालुक्यातून दररोज बेचाळीस हजार लिटर दूध संकलन केले जाते आहे. गुजरात राज्यातील अमूल दुध डेअरी कडून आदिवासी दूध उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते आहे. दूध, स्ट्रॉबेरी प्रकिया उद्योग, आंबा उत्पादक शेतकरी, दूध प्रकिया उद्योग उभारण्याची गरज निर्माण झाली आहे.

तसेच इंद्रजित गावित यांनी केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री भारती पवार यांच्यावर जोरदार टीका करीत ते म्हणाले की, सुरगाणा तालुक्याची आरोग्य सेवा सलाईन वर आहे. आदिवासी आरोग्य मंत्री झाल्याने जनतेच्या अपेक्षा उंचावल्या होत्या आता तरी आरोग्य सेवा उपलब्ध होतील मात्र या बाबतीत घोर निराशाच जनतेच्या पदरी पडली आहे. मंत्री केवळ नावालाच उरले आहेत. ज्यांनी मतदान करून निवडून दिले त्या गरीब आदिवासी जनतेच्या तोंडाला पानेच पुसली आहेत. शासकीय आश्रम शाळेत गणित, विज्ञानाचे शिक्षक भरले नाहीत. आता मात्र काॅपीमुक्त अभियान राबविण्यात येत आहे. हि बाब जरी स्वागतार्ह असली तरी बिषयाचे शिक्षक नसतांना अभियान राबविणे हे कितपत योग्य आहे हे पालकांनीच ठरवावे. यावेळी जनार्दन भोये, माजी सभापती उत्तम कडू, वसंत बागुल, भिका राठोड, मनिषा महाले, विजय घांगळे, संजाबाई खंबायत, सुशिला गायकवाड, भारती बागुल, वैशाली गावित, लक्ष्मी चौधरी, रेखा चौधरी, हौसाबाई गावित आदिसह माकपचे सरपंच बहूसंख्येने उपस्थित होते.

हेही वाचा :

The post नाशिक : हक्काच्या वन जमिनींसाठी पुन्हा लाॅंग मार्च काढणार : जे. पी. गावित यांची माहिती appeared first on पुढारी.