नाशिक : हज यात्रेच्या नावाखाली यात्रेकरुंची फसवणूक

फसवणूक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

हज यात्रेला जाण्याच्या बहाण्याने यात्रेकरूंकडून पैसे घेत त्यांना यात्रेस न नेता चौघांनी गंडा घातला आहे. संशयितांनी पैसे घेत कोरोनामुळे हज यात्रा रद्द झाल्याचे सांगितले, त्यानंतर यात्रेकरूंना पैसे न देता धनादेश दिले. मात्र बँक खात्यात पैसे नसल्याने धनादेश वटला नाही. त्यामुळे यात्रेकरूंची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चार संशयितांविरोधात मुंबई नाका पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. एका संशयिताने यात्रेकरूस जीवे मारण्याची धमकी दिल्याने तक्रारदारांनी पोलिस आयुक्तांना निवेदन देत संशयिताविरोधात कारवाईची मागणी केली आहे.

मे. असफाह हज्ज ॲण्ड उमराह सर्व्हिसेस नाशिक या संस्थेचे भागीदार संशयित नविद सादिकमिया जहागिरदार, सर्फराज इकबाल काझी, मोहम्मद जब्बार शेख, रफिक रब्बार शेख अशी संशयित चौघांची नावे आहेत. फिरोज बशिर सय्यद (रा. राणाप्रताप चौक, सिडको) यांच्या फिर्यादीनुसार, जुलै २०२२ मध्ये संशयितांनी सय्यद यांना हज यात्रेसाठी पॅकेज दिले होते. त्यानुसार त्यांनी पैसे दिले होते. परंतु संशयितांनी त्यांना हज यात्रेसाठी पाठविले नाही. त्यामुळे सय्यद यांनी पैसे परत मागितले असता, संशयितांनी दिले नाहीत. तर संशयित रफिक शेख याने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, अब्दुल हमीद शकूर शेख, फरजाना अब्दुल हमीद शेख यांनी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची भेट घेत निवेदन दिले. त्यात, संशयित जहागीरदार, काझी व मोहम्मद शेख यांनी २०१९ मध्ये हजयात्रेसाठीचे पॅकेज दिले. संशयितांशी ओळख तसेच ते एका मस्जिदचे विश्वस्त असल्याने त्यांच्यावर विश्वास ठेवला. प्रत्येकी पावणे तीन लाख रुपये याप्रमाणे दोघांचे साडेपाच लाखांचे पॅकेज तक्रारदारांनी स्वीकारले. त्याप्रमाणे, अडीच लाख रुपये आगाऊ दिले. उर्वरित तीन लाखांची रक्कम हज यात्रेचा व्हिसा व तिकीट आल्यानंतर देण्याचे ठरले. दरम्यान, २०२० मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे हज यात्रा रद्द केली. तक्रारदारांनी विचारणा केली असता, २०२१ मध्ये हज यात्रा होणार असल्याचे सांगत त्यासाठी उर्वरित तीन लाखांची रक्कमही संशयितांनी मागे लागून घेतली. मात्र २०२१ मध्येही हज यात्रा कोरोनामुळे रद्द केली. संशयितांनी पुन्हा २०२२ मध्ये हज यात्रा होणार असल्याचे आश्वासन दिले.

जून २०२२ मध्ये संशयितांनी त्यांना ३० जून रोजी हज यात्रेची फ्लाइट असून, मुंबईत जायला सांगितले. त्यांना तिथेच व्हिसा आणि तिकीट मिळेल, असे सांगितले. मात्र संशयितांनी त्यांनी फसवणूक केली. त्यांना हजयात्रेला पाठविलेच नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संशयितांकडे पैशांसाठी तगादा लावला. संशयितांनी टाळाटाळ करीत संशयित रफिक जब्बार शेख याने गुंडांना आणून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी संशयित चौघांविरोधात कारवाईची मागणी केली आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : हज यात्रेच्या नावाखाली यात्रेकरुंची फसवणूक appeared first on पुढारी.