नाशिक : हेल्थ कार्डमुळे विद्यार्थ्यांचे होणार शारीरिक परीक्षणनाशिक : हेल्थ कार्डमुळे विद्यार्थ्यांचे होणार शारीरिक परीक्षण; जिल्हा परिषदेचा नावीन्यपूर्ण उपक्रम

हेल्थ कार्ड www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील मुलांच्या आरोग्याबाबत सतर्कता दाखविण्याबाबत जिल्हा परिषदेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. यामध्ये जि.प. आता ० ते ६ आणि ७ ते १८ वयोगटातील मुलांसाठी हेल्थ कार्ड वितरित करणार आहे. दोन महिन्यांतून एकदा विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात येणार असून त्याद्वारे मुलांची शारीरिक क्षमता कशी आहे, याचे परीक्षण करण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यात जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमाची अंमलबजावणी इतर जिल्ह्यांनी केली, तर राज्यातील बालकांचा आरोग्य डाटा तयार होण्यास मदत होऊ शकते.

सध्या राज्यात जागरूक पालक, सुदृढ बालक हे अभियान सुरू असून यात जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ० ते १८ वयोगटातील बालकांची तपासणी होत आहे. या अभियानाद्वारे पुढील दोन महिन्यांत जिल्हाभरातील १२ लाख ८५ हजार मुलांची तपासणी होणार आहे. यात विद्यार्थ्यांची शारीरिक तपासणी नियमित होण्यासाठी नाशिक जि.प.ने हेल्थ कार्ड तयार केले आहे. या हेल्थ कार्डमध्ये विद्यार्थ्याचे नाव, आधार क्रमांक, शाळेचे नाव, पालकांचे नाव, आभा आयडी, युनिक आयडी, रक्तगट, उंची, सर्दी, खोकला, ताप, श्वास घेण्यास त्रास, त्वचा आजार आदी सर्व आजारांबाबत तपासणी होऊन त्याचा अहवाल तयार करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी केंद्र, प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची प्राथमिक तपासणी करण्यात येणार आहे, तर शाळाबाह्य मुलांसाठी संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी, नर्सरी, बाल सुधारगृहामधील मुलांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, आश्रमशाळेमध्ये राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रमांतर्गत असलेले वैद्यकीय अधिकारी, तर खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आरोग्य अधिकारी तपासणी करणार आहेत. त्याद्वारे जिल्ह्यातील सर्व मुलांची तपासणी हेल्थ कार्डवर उतरणार आहे. त्याद्वारे विद्यार्थ्यांना आरोग्याबाबत काही तक्रारी असल्यास त्यावर त्वरित उपाययोजना करण्यात येणार आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : हेल्थ कार्डमुळे विद्यार्थ्यांचे होणार शारीरिक परीक्षणनाशिक : हेल्थ कार्डमुळे विद्यार्थ्यांचे होणार शारीरिक परीक्षण; जिल्हा परिषदेचा नावीन्यपूर्ण उपक्रम appeared first on पुढारी.