Site icon

नाशिक : हेल्थ रिसर्च युनिटच्या बांधकामासाठी दीड कोटीचा निधी मंजूर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
भारत सरकारच्या आरोग्य संशोधन विभागातर्फे व केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या विशेष प्रयत्नाने येथील ग्रामीण रुग्णालयात मॉडेल रुरल हेल्थ रिसर्च युनिट मंजूर झाले आहे. युनिटच्या बांधकामासाठी दीड कोटीचा निधीही मंजूर झाला आहे.

आरोग्य प्रोत्साहनासाठी भारत सरकारने यंदा ‘पायाभूत सुविधांचा विकास’ या योजनेंतर्गत राज्यात व नाशिक जिल्ह्यात एकमेव वणी येथे मॉडेल रुरल हेल्थ रिसर्च युनिटला मंजुरी दिली आहे. येथील मॉडेल रुरल हेल्थ रिसर्च युनिट हे सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभाग आणि आयसीएमआर राष्ट्रीय प्रजनन आणि बाल आरोग्य संशोधन संस्था, मुंबई यांच्या भागीदारीतून स्थापन केले जाईल. या युनिटमधून सिकलसेल, सर्पदंश, माता व बालमृत्यू आणि विकृती, कीटकनाशक विषबाधा, आघात या स्थानिक रोगांवर उपाय करण्यासाठी संशोधन प्रकल्प हाती घेतले जातील. युनिटमध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळेची सुविधा असेल. संशोधनासाठी उपकरणांबरोबरच सोनोग्राफी, ईसीजीसारखी उपकरणे, संशोधनाच्या दोन वैद्यकीय संशोधकासंह प्रयोगशाळा तंत्रज्ञ असे 10 अधिकारी व कर्मचारी युनिटमध्ये असतील. दरम्यान, वणी ग्रामीण रुग्णालयाच्या आवारातील कर्मचार्‍यांच्या निवास इमारतीच्या जागेवर मॉडेल रुरल हेल्थ रिसर्च युनिट बांधण्यात येणार असून, आवश्यक प्रशासकीय मान्यता मिळून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे. ग्रामीण भागामध्ये पसरणारे रोग, स्थानिक रुग्णांच्या गरजा यासह विविध मुद्द्यांवर संशोधन करण्याचे काम या युनिटमध्ये केले जाईल. त्याशिवाय आजारांवर होणारे संशोधन आणि लसीकरण यासाठी या युनिटचा उपयोग केला जाणार आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : हेल्थ रिसर्च युनिटच्या बांधकामासाठी दीड कोटीचा निधी मंजूर appeared first on पुढारी.

Exit mobile version