नाशिक-हैदराबाद विमानसेवेला प्रतिसाद, पहिल्याच दिवशी ‘इतके’ प्रवाशी

विमान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कोरोनाचा प्रभाव बर्‍यापैकी कमी झाल्याने, नाशिक विमानतळावरून वेगवेगळ्या कंपन्यांकडून विमानसेवा पूर्ववत केली जात आहे. स्पाइसजेट कंपनीकडून शुक्रवार (दि. 22)पासून नाशिक-हैदराबाद ही सेवा सुरू करण्यात आली असून, पहिल्याच दिवशी तब्बल 64 प्रवाशांनी विमानसेवेचा लाभ घेतला.

काही दिवसांपूर्वीच नाशिक-हैदराबाद विमानसेवेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार हैदराबादहून 36 प्रवाशांना घेऊन फ्लाइटने सकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी टेकऑफ केले, तर नाशिकमध्ये सकाळी 7 वाजून 50 मिनिटांनी पोहोचले. त्याचबरोबर नाशिकहून 28 प्रवाशांसह विमान सकाळी 8 वाजून 10 मिनिटांनी हैदराबादच्या दिशेने निघाले. या फ्लाइटला स्पाइसजेटकडून तिरुपतीसाठी कनेक्टदेखील उपलब्ध करून दिल्याने, नाशिककरांसाठी ही सेवा अत्यंत महत्त्वपूर्ण समजली जात आहे. विशेष म्हणजे नाशिक-हैदराबाद ही विमानसेवा नियमित असल्याने नाशिककरांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. त्याचबरोबर 4 ऑगस्टपासून कंपनीकडून नाशिक-दिल्ली ही नियमित विमानसेवा सुरू केली जाणार आहे.

दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे स्पाइसजेट कंपनीने विमानसेवा बंद केली होती. आता कोरोनाचा प्रादुर्भाव बर्‍यापैकी कमी झाल्याने कंपनीकडून आपल्या सेवांना अधिक वेग दिला जाण्याची शक्यता आहे. पुढच्या काळात आणखी काही शहरांना जोडणारी विमानसेवा सुरू केली जाण्याचीही शक्यता आहे. स्पाइसजेट व्यतिरिक्त एलाइन्स एअर व स्टार एअर या दोन कंपन्यांच्याही फ्लाइट नाशिक विमानतळावरून सुरू आहेत.

हेही वाचा :

The post नाशिक-हैदराबाद विमानसेवेला प्रतिसाद, पहिल्याच दिवशी 'इतके' प्रवाशी appeared first on पुढारी.