नाशिक : है तयार हम.! ४९० आपदा मित्र आपत्ती निवारणासाठी सज्ज

आपदा मित्र, www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पूर, भुकंप, वादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीसोबत मानवनिर्मित आपत्तींत नागरिकांच्या मदतीसाठी ४९० आपदा मित्र सज्ज झाले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या पुढाकारातून महाराष्ट्र पोलीस अकादमीत १२ दिवसांचे आपत्ती निवारणाचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करत या मित्रांनी आपत्तीवेळी कोणत्याही परिस्थितीत मदतकार्यासाठी ‘है तयार हम’ म्हणून दाखवून दिले आहे.

गेल्या काही वर्षात देशभरात आपत्तींच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. प्रसंगी काही घटनांमध्ये शासकीय यंत्रणांची मदत वेळेवर पोहचत नसल्याने मानवी व वित्तहानीची दाहकता वाढते. त्या मुळे अशा घटना देशासाठी ही चिंतेची बाब ठरतात. हीच बाब लक्षात घेत केंद्र सरकारने प्रत्येक जिल्ह्यात आपत्तीवेळी तातडीच्या मदतकार्यासाठी आपदा मित्रांची फळी निर्माण करण्यात येत आहे. त्याअंतर्गत नाशिक जिल्ह्यात ४९० स्वयंसेवकांची फळी आपत्ती निवारणच्या कार्यात मदती करीता तयार झाली आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पुढाकारातून जिल्ह्यातील १८ ते ४० वयोगटामधील ४९० युवकांना टप्याटप्याने महाराष्ट्र पोलीस अकादमीत १२ दिवसांचे माेफत निवासी प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रशिक्षणावेळी स्वयंसेवकांना पुर परिस्थितीमधील मदतकार्य; प्रथमोपचार, फायर सेफ्टी व यंत्रणा हाताळणी, रॅपलिंग, वातावरणीय बदल आणि रासायनिक पदार्थातून निर्माण झालेली आपतीत स्थानिक पातळीवर करावयाच्या मदतीबाबत या स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्यात आले. त्यामूळे भविष्यात जिल्ह्यात एखादी आपत्ती ओढावल्यास तेथे शासकीय यंत्रणांच्या खांद्याला-खांदा लावून मदतकार्य करताना आपल्याला आपदा मित्र पाहवयास मिळतील.

युवतीही आघाडीवर

जिल्ह्यातील आपदा मित्र प्रशिक्षण घेणाऱ्या स्वयंसेवकांमध्ये युवती आघाडीवर असल्याचे पाहायला मिळाले. ४९० मधून सुमारे ३० टक्के म्हणजे १४० युवतींनी आपत्ती निवारणाचे धडे गिरवले. जिल्हाधिकारी गंगाथरण डी आणि निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीकृष्ण देशपांडे यांनी प्रशिक्षण आयोजनात मुख्य भुमिका पार पाडली.

विविध संस्थांकडून मार्गदर्शन

बारा दिवसांच्या प्रशिक्षण कालावधीत आपदा मित्रांना पोलीस, राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक (एनडीआरएफ), राज्य आपत्ती निवारण पथक (एसडीआरएफ), मनपा अग्निशमन विभाग, डॉक्टर्स व आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभले. विशेष म्हणजे राज्यात एकमेव नाशिकमध्ये आपदा मित्रांना पोलीस अकादमीत प्रशिक्षणाचे धडे मिळाले. प्रशिक्षणात अखेरीस ६० गुणांची प्रात्यक्षिक व ४० गुणांच्या लेखी परिक्षेला प्रशिक्षणार्थी सामोरे गेले.

किटसोबत विमाकवच

आपदा मित्रचे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या स्वयंसेवकांना अंदाजे १५ हजार रूपयांचे किट मोफत देण्यात आले. या किटमध्ये टी-शर्ट, रेनकोट, सेफ्टी हेल्मेट, प्रथोमपचार कीट, बॅटरी, बुट यासह विविध १७ ते १८ वस्तू उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. आपदा मित्रांना ओळखपत्रा सह शासनाकडून ५ लाखांचे विमाकवचही देण्यात आले आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : है तयार हम.! ४९० आपदा मित्र आपत्ती निवारणासाठी सज्ज appeared first on पुढारी.