नाशिक : ४० टक्के व्याजदराने कर्ज देणाऱ्या सावकारांविरोधात गुन्हा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

बेकायदेशीररीत्या सावकारी व्यवसाय करणाऱ्या दोघा संशयितांविरोधात उपनिबंधक विभागाने कारवाई करीत अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी संशयित मोहिनी पवार व राजू पवार (दोघे रा. अभियंतानगर, कामटवाडे, सिडको) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. संशयितांनी कर्जदारांना १० ते ४० टक्के व्याजदराने कर्ज दिल्याचे पोलिस तपासात समोर येत आहे.

शहरात खासगी सावकारांच्या जाचाला कंटाळून दाम्पत्य, पित्यासह दोन मुलांसह इतर घटनांमध्ये युवकांनी आत्महत्या केल्या आहेत. जानेवारीत काही तक्रारदारांनी खासगी सावकारांविरोधात उपनिबंधक कार्यालयाकडे तक्रारी केल्या होत्या. तक्रारींच्या अनुषंगाने ३१ जानेवारीला काही सावकारांच्या घरझडती घेतल्या होत्या. सावकारांच्या घरातून आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे जप्त करून त्यांची तपासणी केली. शहानिशा केल्यानंतर संशयित मोहिनी पवार व राजू पवार हे बेकायदा सावकारी व्यवसाय करत असल्याचे आढळून आले. त्यामुळे विभागाने अंबड पोलिस ठाण्यात मोहिनी व राजू पवार विरोधात सावकारी नियंत्रण कायदा, महाराष्ट्र सावकारी अध्यादेश कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रथमदर्शनी तथ्य आढळल्याने मंगळवारी (दि. ७) सहकार अधिकारी प्रदीप महाजन यांनी अंबड पोलिसांत फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले.

सहकार खात्याला प्राप्त झालेल्या कागदपत्रानुसार धाड टाकलेल्यांपैकी आणखी काही जणांवर कारवाईची शक्यता आहे. दरम्यान, मोहिनी व राजू पवार हे दोघेही ४० टक्के व्याजदराने कर्ज वाटत असल्याचे तपासातून समोर येत आहे. कर्जदारांकडून एखादा हप्ता चुकल्यास कर्जदाराकडून प्रतिदिवस ५०० रुपये दंड व त्यांच्या घरातून चीजवस्तू उचलून नेत असल्याचाही आरोप होत आहे.

धनादेश, पावत्या सापडल्या

मोहिनी पवार, राजू पवार यांच्या घराची पंचासमक्ष व पोलिस बंदोबस्तात झडती घेण्यात आली. या झडतीमध्ये पथकाच्या हाती ३८ व्यक्तींचे धनादेश व आर्थिक व्यवहाराची संबंधित विविध कागदपत्रे मिळाली, तर २६ व्यक्तींचे आर्थिक व्यवहाराचे हात उसनवार पावत्या व कोरे धनादेशही मिळून आले. याशिवाय अनेक व्यक्तींच्या नावे असलेले बँकेचे पासबुकही या झडतीमध्ये पथकाच्या हाती लागले.

पथकाने कारवाई केल्यानंतर संबंधित प्रकरणात जप्त कागदपत्रे आणि अहवाल सादर केला होता. त्याबाबतची शहानिशा केल्यानंतर प्रथमदर्शनी काही प्रकरणांमध्ये तथ्य आढळून येत असल्याने संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश तपास अधिकाऱ्यांना दिले होते. इतर प्रकरणांचीही पडताळणी करण्यात आली आहे.

– फैयाज मुलानी, उपनिबंधक, नाशिक तालुका

हेही वाचा : 

The post नाशिक : ४० टक्के व्याजदराने कर्ज देणाऱ्या सावकारांविरोधात गुन्हा appeared first on पुढारी.