नाशिक : 12 लाख नागरिकांना बूस्टर डोसचे नियोजन

बूस्टर डोस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात बूस्टर म्हणजे कोरोना प्रतिबंधक लशींचा वर्धक डोस सर्व नागरिकांना देण्यास 15 जुलैपासून सुरुवात झाली. जिल्ह्यातील 12 लाख 61 हजार 357 नागरिकांना बूस्टर डोस देण्याचे नियोजन जिल्हा परिषद आरोग्य विभागाने केले आहे. त्यासाठी 112 प्राथमिक आरोग्य केंद्रांवरील 450 केंद्रांवर बूस्टर डोस दिले जाणार आहेत. आतापर्यंत 10 हजार नागरिकांना बूस्टर डोस दिले आहेत.

बूस्टर डोस यापूर्वी केवळ आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन कर्मचारी आणि 60 वर्षांवरील ज्येष्ठांसह गंभीर आजार असलेल्या ज्येष्ठांना हा तिसरा डोस दिला जात होता. बहुतांश फ—ंटलाइन कर्मचारी आणि इच्छुक ज्येष्ठ नागरिकांना हे बूस्टर डोस देण्यात आले. आता शासनाने हा बूस्टर डोस ऐच्छिक ठेवत सर्व नागरिकांना खुला केला आहे. ज्यांना आवश्यक आहे, असे वाटणार्‍या कुणाही 18 वर्षांवरील नागरिकांना हा डोस उपलब्ध करून देण्यात आला आहे. यानुसार जिल्हा आरोग्य विभागाने जिल्ह्यातील 112 प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 450 लसीकरण केंद्रांवर हा डोस मोफत दिला जाणार आहे. जिल्ह्यात बूस्टर डोससाठी पात्र असणार्‍यांची संख्या 12 लाख 61 हजार 357 आहे. यात कोव्हॅक्सिन डोस असणार्‍यांची संख्या दोन लाख 12 हजार 782, तर 10 लाख 48 हजार 575 नागरिक कोविशिल्ड बूस्टर डोससाठी पात्र आहेत.

जिल्ह्यातील सर्व लसीकरण केंद्रांवर पहिल्या दिवसापासून किमान 100 डोसची उपलब्धता ठेवण्यात आली आहे. पुढील 75 दिवस नागरिकांना हे सर्व बूस्टर डोस मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात लशींचा साठा उपलब्ध असल्याने अधिकाधिक नागरिकांनी लसचा लाभ घ्यावा.
– डॉ. कपिल आहेर,
जिल्हा आरोग्य अधिकारी,
जिल्हा परिषद, नाशिक

हेही वाचा :

The post नाशिक : 12 लाख नागरिकांना बूस्टर डोसचे नियोजन appeared first on पुढारी.