नाशिक : 145 गावांना मिळणार 24 तास थ्री फेज वीज; आमदार कोकाटे यांच्या पाठपुराव्याला यश

sinner www.pudhari.news

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
सिन्नर विधानसभा मतदारसंघातील 145 गावांतील शेतशिवारात घरगुती व व्यावसायिक वापरासाठी सुधारित वितरण क्षेत्र (आरडीएसएस) योजनेंतर्गत 24 तास थ्री फेज वीज मिळणार असून, त्यासाठी आमदार माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. 70 कोटी रुपयांतून हे काम आगामी 2 वर्षांच्या आत पूर्ण होणार आहे.

मतदारसंघात गावांमध्ये सिंगल फेज योजना आहे, तथापि शिवारातील अनेक वाडी-वस्त्यांवर ही योजना नाही. शिवारात राहणार्‍या शेतकर्‍यालाही घरगुती वापराची अखंडित वीज मिळाली पाहिजे, या भावनेने केंद्र व राज्य सरकारच्या प्रत्येकी 50 टक्के निधीतून सुधारित वितरण क्षेत्र (आरडीएसएस) योजना राबविण्यात येते. त्यातून सिन्नर विधानसभा मतदारसंघात हे काम होण्यासाठी आमदार कोकाटे यांनी ऊर्जा विभागाच्या अधिकार्‍यांकडे वारंवार पाठपुरावा केला होता. त्यातून हे काम मंजूर झाले असून, निविदा प्रक्रिया पूर्ण होताच हे काम सुरू होणार आहे.

11 केव्ही वाहिनी फिरणार; 294 रोहित्रांना वीज
आरडीएसएस योजनेचा आराखडा बनविताना गावठाणासोबतच वाड्या-वस्त्यांचाही त्यात समावेश करण्याची सूचना आमदार कोकाटे यांनी 21 सप्टेंबर 2022 रोजी अधीक्षक अभियंता पडळकर यांच्या दालनात झालेल्या बैठकीत केली होती. नव्याने 54 फीडर,294 रोहित्रे, जुन्या फीडरवर 69 एचडीटी बसविण्यात येणार आहे. शिवारात 11 केव्हीची वाहिनी फिरणार असून, तेथून नवीन 294 रोहित्रांना वीजपुरवठा करण्यात येईल. त्यानंतर एबी केबलद्वारे ग्राहकांना वीजपुरवठा करण्यात येईल.त्यामुळे वीजचोरी होणार नाही.

केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त तरतुदीतून राबविण्यात येणार्‍या आरडीएसएस योजनेचा आराखडा बनवताना त्यात गावठाणासोबतच वाड्या-वस्त्यांचाही समावेश करण्याची मागणी ऊर्जा विभागाच्या अधिकार्‍यांकडे केली होती. त्यानुसार कामे मंजूर झाली असून, लवकरच ही कामे सुरू होतील. – माणिकराव कोकाटे, आमदार सिन्नर.

हेही वाचा:

The post नाशिक : 145 गावांना मिळणार 24 तास थ्री फेज वीज; आमदार कोकाटे यांच्या पाठपुराव्याला यश appeared first on पुढारी.