नाशिक : 40 ग्रामपंचायतींसाठी 82 टक्के मतदान, आज होणार मतमोजणी

निवडणूक www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील 40 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी गुरुवारी (दि. 4) मतदारांनी भरघोस मतदान केले. जिल्ह्यात तब्बल 81.96 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. तालुकास्तरावर शुक्रवारी (दि. 5) मतमोजणी करण्यात येणार असून, निकालाकडे गावकर्‍यांचे लक्ष लागले आहे.

जिल्ह्यातील बागलाण, निफाड, सिन्नर, येवला, चांदवड, देवळा आणि नांदगाव या सात तालुक्यांमधील 40 ग्रामपंचायतींसाठी शांततेत मतदान पार पडले. राज्यात सत्तानाट्यानंतर पहिल्यांदाच ग्रामपंचायतींचा रणसंग्राम रंगत असल्याने या निवडणुकांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

40 ग्रामपंचायतींमधील मतदान केंद्रांसमोर सकाळी साडेसात ते साडेअकरा या वेळेत मतदानासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. मात्र, दुपारच्या वेळेत मतदान प्रक्रियेत संथपणा आल्यानंतर साडेचार ते साडेपाच या अंतिम एका तासात पुन्हा एकदा मतदारांनी केंद्रांसमोर रांगा लावल्या होत्या. निवडणुकीत एकूण 37 हजार 969 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये 20 हजार 311 पुरुष व 17 हजार 658 महिला मतदारांचा समावेश होता. दरम्यान, उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाल्यानंतर रात्री उशिरा हे मशीन तालुक्याच्या ठिकाणी पोहोचले. शुक्रवारी (दि. 4) सकाळपासून मतमोजणी सुरू होणार असून, दुपारी 12पर्यंत सर्व निकाल हाती येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : 40 ग्रामपंचायतींसाठी 82 टक्के मतदान, आज होणार मतमोजणी appeared first on पुढारी.