नाशिक : 78 कोटी रुपयांच्या कामांवरील स्थगिती दूर, पालकमंत्र्यांची मंजुरी

दादा भुसे,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 2021-22 मधील 78 कोटींच्या कामांवरील स्थगिती पालकमंत्री दादा भुसे यांच्या मंजुरीने उठविण्यात आल्याने दीड वर्षापासून रखडलेल्या विकासकामांचा मार्ग मोकळा झाला. रस्ते, क्रीडा विभाग व अन्य तत्सम कामांचा यामध्ये समावेश आहे. जिल्हा वार्षिक योजने (डीपीसी) अंतर्गत सर्वसाधारण उपयोजनांच्या 2021-22 च्या निधी वाटपावरून जिल्ह्यात वादंग उभे ठाकले होते. नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी निधी वाटपात अन्याय

झाल्याचे सांगत तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळांविरोधात शड्डू ठोकले होते. तत्कालीन मविआ सरकारमधील आमदाराने निधी वाटपावरून ओरड केल्याने राज्यभरात हा विषय गाजला. त्याचदरम्यान, जूनअखेर राज्यात सत्तांतर होऊन नवीन सरकार आले. आ. कांदे यांनी तत्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत निधी वितरणातील कामांना स्थगिती देण्याची मागणी केली. त्यानुसार मुख्यमंर्त्यांनी जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्याशी संपर्क साधत 1 एप्रिल 2022 पासूनच्या कामांना मान्यता न देण्याचे आदेश दिले.

तसेच नवीन पालकमंर्त्यांच्या संमतीने सदर कामांना मान्यता घेण्याच्या सूचनाही केल्या होत्या. त्यामुळे 2021-22 मधील प्रशासकीय मान्यता दिलेल्या तब्बल 78 कोटींच्या कामांच्या वर्क ऑर्डर रखडल्या होत्या. जिल्हा नियोजन विभागाने पालकमंत्री भुसे यांच्याकडे सदर कामांची यादी सादर करताना स्थगिती उठविण्याची विनंती केली होती. ना. भुसेंनी कामांची माहिती जाणून घेत स्थगिती उठविण्याचे निर्देश दिले. त्यानुसार जिल्हाधिकार्‍यांनी सोमवारी (दि.14) वर्क ऑर्डरला मान्यता देण्याच्या फाइलवर स्वाक्षरी केली. दरम्यान, स्थगिती उठविण्यात आल्याने संबंधित कामांची वर्क ऑर्डर काढण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी यांनी दिली.

The post नाशिक : 78 कोटी रुपयांच्या कामांवरील स्थगिती दूर, पालकमंत्र्यांची मंजुरी appeared first on पुढारी.