नाशिक : 84 हजार केशरी शिधापत्रिकांची प्रतीक्षा; पुरवठा विभागाने शासनाकडे नोंदविली मागणी

नाशिक : पुढारी वृत्तेसवा
जिल्ह्यात केशरी शिधापत्रिकांची टंचाई आहे. जिल्हा पुरवठा विभागाने ही टंचाई दूर करण्यासाठी 84 हजार केशरी शिधापत्रिकांची मागणी शासनाकडे नोंदविली आहे. पण, राज्यपातळीवरून या शिधापत्रिका कधी उपलब्ध होतील, याबाबत साशंकता आहे. त्यामुळे शिधापत्रिकाअभावी लाभार्थ्यांना रेशनसह महात्मा फुले जनआरोग्य व संजय गांधी निराधार योजनांपासून वंचित राहावे लागत आहे.

समाजातील आर्थिक दुर्बल घटकांमधील नागरिकांना केशरी शिधापत्रिकेवर महिन्याकाठी धान्य वितरण केले जाते. तसेच शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत सरकारी रुग्णालयांमध्ये या शिधापत्रिकेवर दीड लाखापर्यंत आरोग्य सुविधांचा लाभ नागरिकांना मिळतो. याशिवाय संजय गांधी निराधार यासह अन्य योजनांमध्येही केशरी शिधापत्रिका अधिक महत्त्वाची आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात केशरी शिधापत्रिकांचा तुटवडा आहे. नवीन शिधापत्रिका उपलब्ध नसल्याने पात्र लाभार्थ्यांना रेशनसह अन्य महत्त्वाच्या योजनांवर पाणी सोडावे लागते आहे. जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिकांचा तुटवडा विचारात घेता पुरवठा विभागाने सुमारे तीन महिन्यांपूर्वी 84 हजार नवीन शिधापत्रिकांची मागणी शासनाकडे नोंदविली आहे. त्यासाठीचा पाठपुरावादेखील प्रशासनाकडून करण्यात येत आहे. परंतु, शासनाच्या छपाई प्रेसमध्येच शिधापत्रिका छपाईसाठी अनंत अडचणी येत आहेत. परिणामी वारंवार मागणी करूनही शिधापत्रिका उपलब्ध होत नसल्याने प्रशासनही हतबल झाले आहे. शिधापत्रिकांअभावी लाभार्थ्यांच्या नशिबी प्रतीक्षा करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.

हेही वाचा:

The post नाशिक : 84 हजार केशरी शिधापत्रिकांची प्रतीक्षा; पुरवठा विभागाने शासनाकडे नोंदविली मागणी appeared first on पुढारी.