नाशिक : 88 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान तर उद्या मतमाेजणी

दिंडोरी www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील तीन तालुक्यांमधील 88 ग्रामपंचायतींमध्ये रविवारी (दि.18) सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या काळात मतदान होणार आहे. मतदार थेट सरपंचपदासाठी 259 व सदस्यांसाठीच्या 934 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद करतील. अधिकारी-कर्मचारी शनिवारी (दि.17) दुपारी ईव्हीएम आणि मतदान साहित्यासह केंद्राकडे रवाना झाले.

राज्यातील सत्तांतर नाट्यानंतर एकाचवेळी 609 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडणार आहेत. जिल्ह्यातील नाशिक, दिंडोरी व कळवण या तीन तालुक्यांमधील 88 ग्रामपंचायतींचा यात समावेश आहे. थेट सरपंच पदामुळे यंदाच्या निवडणुकींमध्ये रंगत आली आहे. गेल्या दहा दिवसांपासून आरोप-प्रत्यारोपांच्या फेर्‍यांमुळे गावागावांमधील राजकारण ढवळून निघाले आहे. निवडणुकीत रविवारी (दि.18) मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. जिल्हा प्रशासनाने 88 ग्रामपंचायतींसाठी 291 मतदान केंद्र अंतिम केले आहे. या मतदान केंद्रांवर 291 ईव्हीएमच्या सहाय्याने मतदार त्यांचा मतदानाचा हक्क बजावतील. मतदान शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाने एकूण 1 हजार 746 अधिकारी व कर्मचार्‍यांची नियुक्ती केली आहे. प्रत्येक केंद्रावर एक पथक नेमण्यात आले असून, त्यामध्ये एक केंद्राधिकारी, 3 निवडणूक अधिकारी, प्रत्येकी एक शिपाई व पोलिस असणार आहे. तालुका स्तरावरून हे सर्व कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना झाले. दरम्यान, अखेरच्या टप्प्यात उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटींवर भर दिला आहे. शेवटी मतदारांनी कोणाच्या पारड्यात त्यांची मते टाकली हे सोमवारी (दि.19) मतमोजणीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल.

हेही वाचा:

The post नाशिक : 88 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान तर उद्या मतमाेजणी appeared first on पुढारी.