ना. गिरीश महाजन : एकनाथ खडसेंच्या मुलाची हत्या की आत्महत्या? 

गिरीश महाजन www.pudhari.news

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात दूध संघाच्या निवडणूकीमुळे गेल्या काही दिवसांपासून राजकारण चांगलेच तापले आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे आणि भाजप नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. विशेष म्हणजे आता दोघा नेत्यांमधील वाद आता टोकाला गेला असून, एकमेकांच्या परिवारावर टीका टिप्पणी केली जात आहे. दुर्दैवाने गिरीश महाजन यांना मुलगा नाही, नाहीतर तो देखील राजकारणात आला असता, असे विधान एकनाथ खडसे यांनी केले. यावर गिरीश महाजन यांनी पलटवार केला आहे. ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या या विधानामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

जळगावमध्ये माजी मंत्री एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीष महाजन यांच्यातील वाद आता विकोपाला जात आहे. मागच्या काही दिवसांपासून गिरीष महाजन आणि एकनाथ खडसे एकमेकांवर जोरदार प्रहार करताना दिसून येत आहे. सोमवारी (दि.२१) औषधांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून खर्च करण्यावरून गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात खडाजंगी झाली आहे. या बैठकीनंतर गिरीश महाजन यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना मोठे विधान केले आहे.

आमदार खडसे यांच्या टीकेवर प्रत्युत्तर देताना मंत्री महाजन म्हणाले, ”मुली असणे म्हणजे दुर्दैव नव्हे. मला दोन मुली असून त्या अद्याप तरी राजकारणात नाहीत. मात्र, खडसे यावरून भाष्य करतात. मला हा विषय काढायचा नव्हता. मात्र ते बोललेच आहे तर सांगतो की मला दोन मुली आहेत, हे दुर्दैव नाही, हे सुदैवच मी आनंदी आहे. त्या राजकारणात येणार नाहीत. खडसे यांना मुलगा होता त्याचे नेमके काय झाले? त्याने आत्महत्या केली की, त्याचा खून झाला? हे देखील त्यांनी सांगावे !” अशा शब्दांमध्ये ना. महाजन यांनी आमदार एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

भोसरी घोटाळा, दुध संघ अपहार अशा अनेक प्रकरणांमध्ये एकनाथ खडसे यांची चौकशी सुरु आहे. यात सबळ पुरावे मिळत आहेत. त्यामुळे त्यांचे संतुलन ढासळले आहे. ते अस्वस्थ झाले आहेत. मुख्यमंत्री स्तरावरील असणारी व्यक्ती अशी भाषा करत आहे. सादरे प्रकरणातही अवैध वाळू वाहतूक प्रकरणात काही नेते आहेत. त्यात त्यांचे नाव आले होते. सादरेंच्या पत्नीने तिच्या पतीच्या मृत्यूमागे दोषी कोण आहेत? हे आधीच सांगितले होते.

मोक्क्याला ईडीनं उत्तर…

तुमच्या मागे ईडी लागली त्यात तुमचं कर्तृत्वच तसं होतं. तुमचे जावई १७ महिने जेलमध्ये आहेत. त्यांचा जामीन का करत नाही. तुम्ही माझ्यावर मोक्का लावला हे षड़यंत्र पेनड्राईव्हमध्ये आलं आहे. आता तुम्ही मला मोक्का लावला त्याची चौकशी सुरु आहे. आता तुमची ईडीची चौकशी सुरु झाली असून, त्यात तुम्ही किती स्वच्छ आहात हे स्पष्ट होईल, असा इशाराही ना. महाजन यांनी यावेळी दिला.

हेही वाचा:

The post ना. गिरीश महाजन : एकनाथ खडसेंच्या मुलाची हत्या की आत्महत्या?  appeared first on पुढारी.