Site icon

ना. डॉ. विजयकुमार गावित : उत्तम आरोग्यासाठी खेळांचे महत्त्व अनन्यसाधारण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सर्वांगीण आरोग्यासाठी खेळांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जनासोबत आदिवासी संस्कृतीचेही जतन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले.

पंचवटीमधील विभागीय क्रीडा संकुलात आदिवासी विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन शनिवारी (दि.12) ना. गावित यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आदिवासी विभागाचे आयुक्त हिरालाल सोनवणे, अपर आयुक्त तुषार माळी, संदीप गोलाईत, नाशिक जातपडताळणी समितीचे सहआयुक्त विनोद पाटील, उपआयुक्त अविनाश चव्हाण, सुदर्शन नगरे, हितेश विसपुते, सहायक आयुक्त हेमलता गव्हाणे, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे आदी उपस्थित होते. डॉ. गावित म्हणाले की, जीवनात चांगला खेळाडू होण्यासाठी शिस्त, कौशल्य, चांगल्या सवयी, शारीरिक क्षमता, मानसिक आरोग्य या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. या गोष्टी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवणे गरजेचे आहे. आश्रमशाळेच्या आवारात क्रीडांगण तयार करावेत. संस्कृतीचे महत्त्व सांगताना पारंपरिक वाद्य, नृत्य, भाषा यांचे शिक्षण आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना द्यावे. जेणेकरून या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून संस्कृतीची जपणूक होण्यास मदत होईल, असे ना. गावित यांनी सांगितले. केंद्र व राज्य शासनामार्फत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्या योजनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रगतीसाठी संधी प्राप्त होत असते. या संधीचे रूपांतर स्वतःच्या प्रगतीसाठी करण्यावर विद्यार्थ्यांनी भर द्यावा, अशी सूचना ना. गावित यांनी केली. कार्यक्रमाच्या प्रारंभी ना. डॉ. गावित यांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करण्यात आली. राज्यातील एक हजार 746 खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. या सर्व खेळाडूंना क्रीडा स्पर्धेसाठी शपथ देण्यात आली. बंगळुरू येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांना ना. डॉ. गावित यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. संदीप गोलाईत यांनी आभार मानले. यावेळी आदिवासी विभागातील अधिकारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा:

The post ना. डॉ. विजयकुमार गावित : उत्तम आरोग्यासाठी खेळांचे महत्त्व अनन्यसाधारण appeared first on पुढारी.

Exit mobile version