पदवीधर निवडणूक : अखेरच्या आठवड्यात उमेदवारांचा लागणार कस

नाशिक पदवीधर मतदारसंघ www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक पदवीधर मतदारसंघाचे मतदान अवघ्या आठवड्याभरावर येऊन ठेपले आहे. अखेरच्या टप्प्यात प्रचाराला वेग आला आहे. मतदारसंघाचे कार्यक्षेत्र असलेल्या पाचही जिल्ह्यांतील पदवीधर मतदारांपर्यंत पोहोचताना उमेदवारांचा कस लागत आहे.

येत्या ३० तारखेला पदवीधर मतदारसंघासाठी मतदान होत आहे. निवडणुकीसाठी विभागातील पाचही जिल्ह्यांमधून २ लाख ६२ हजार ७३१ पदवीधरांची नोंद झाली आहे. यंदा १६ अपक्ष उमेदवार त्यांचे नशीब आजमावत असले, तरी राष्ट्रीयीकृत राजकीय पक्षांचा एकही उमेदवार रिंगणात नसल्याने ही निवडणूक वैशिष्ट्यपूर्ण ठरली आहे. त्यातच १५ दिवसांपासून नाशिक पदवीधरवरून राजकीय घडामोडी जोरदार घडत असल्याने अवघे राजकारण ढवळून निघाले आहे. त्यामुळे आता नाशिकच्या लढतीकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे. पदवीधरच्या निवडणुकीसाठी ३० जानेवारीला मतदान होत असले, तरी प्रचाराच्या तोफा ४८ तास अगोदर म्हणजेच २८ जानेवारीला सायंकाळी थंडावतील. त्यामुळे प्रचारासाठी अवघ्या आठ दिवसांचा कालावधी असताना पाचही जिल्ह्यांतील पदवीधर मतदारांपर्यंत पोहोचण्याचे मोठे काम उमेदवारांना करावे लागणार आहे. त्यामुळे निवडणुकीत पहिल्या पसंतीची मते घेत निवडून येण्यासाठी उमेदवारांनी आता रणनीती ठरविली आहे. त्यानुसार उमेदवारांकडून आता त्यांच्या समर्थकांवर तालुकास्तरापासून ते जिल्हा पातळीपर्यंत जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या सर्व घडामोडींत पदवीधरचे रणांगण कोण मारणार हे मात्र, २ फेब्रुवारीला निकालानंतरच स्पष्ट होईल.

उमेदवार झिजवतात उंबरठे
विभागातील पाचही जिल्ह्यांतील पदवीधर मतदारांपर्यंत पोहोचता-पोहोचता उमेदवारांची दमछाक होत आहे. तसेच विविध राजकीय पक्षांचे नेते, शिक्षक, कर्मचाऱ्यांसह निरनिराळ्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेण्यात उमेदवारांचा वेळ खर्ची पडत आहे. निवडणुकीत एक-एक मतदान पदरी पाडून घेण्यासाठी उंबरठे झिजवण्याची वेळ उमेदवारांवर आली आहे.

हेही वाचा:

The post पदवीधर निवडणूक : अखेरच्या आठवड्यात उमेदवारांचा लागणार कस appeared first on पुढारी.