पदवीधर निवडणूक : विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा

विभागीय आयुक्त www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी 30 जानेवारीला मतदान होणार आहे. विभागातील पाचही जिल्ह्यांत मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडावी, या द़ृष्टीने विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सोमवारी (दि.9) पूर्वतयारीचा आढावा घेतला.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या समिती कक्षात आयोजित बैठकीस जिल्हाधिकारी गंगाथरन डी., धुळ्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा, उपआयुक्त संजय काटकर, रमेश काळे, उन्मेष महाजन व प्रज्ञा बढे-मिसाळ यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. दूरद़ृश्य प्रणालीद्वारे नगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मनीषा खत्री, धुळ्याचे उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर व जळगावचे तुकाराम हुलावळे उपस्थित होते. आयुक्त गमे यांनी बैठकीत मतपेट्यांची उपलब्धता, मतपत्रिका छपाईचा आढावा घेतला. तसेच निवडणूक काळातील वाहनाबाबतचे नियोजन, सूक्ष्म निरीक्षक नियुक्त्या, तसेच निवडणूक प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडण्यासाठी सुरक्षाव्यवस्थेबाबत नियोजन आदींबाबत सूचना केल्या. निवडणूक काळात सर्व अधिकार्‍यांनी समन्वयाने काम करून निवडणूक प्रक्रिया यशस्वी करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

आचारसंहितेची पहिली तक्रार
पदवीधर निवडणूक आचारसंहिता भंगाबाबत जिल्हा प्रशासनाकडे पहिली तक्रार प्राप्त झाली आहे. दिंडोरी तालुक्यातील आशेवाडी ग्रामपंचायतीत सरपंचपदाच्या उमेदवाराने विनापरवानगी विजेचे खांब उभे केल्याची तक्रार ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे. जिल्हा प्रशासनाने सदर तक्रार विभागीय आयुक्तांकडे हस्तांतरित केली आहे.

हेही वाचा:

The post पदवीधर निवडणूक : विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा appeared first on पुढारी.