पालकमंत्री दादा भुसे : मनपातील विशेष बैठकीत भाजपचाच वरचष्मा

दादा भुसे,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पालकमंत्री दादा भुसे यांनी महापालिकेत घेतलेल्या विशेष बैठकीत शिंदे गटाच्या पदाधिकार्‍यांची कमी आणि भाजपच्याच आमदारांसह पदाधिकार्‍यांची छाप दिसून आली. मनपात भाजपची सत्ता राहिलेली आहे. त्यामुळे आगामी निवडणुका पाहता महापालिकेत आढावा घेतला जात असताना त्यात शिंदे गटाकडून अधिक लुडबूड नको, यादृष्टीनेच भाजपकडून वॉच ठेवला जात आहे की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) यांचे सरकार सत्तेवर आलेले असले तरी या दोन्ही पक्षांमधील पदाधिकार्‍यांमध्ये ठिकठिकाणी वर्चस्ववाद सुरू झाला आहे. त्याचा प्रत्यय गुरुवारी (दि.3) महापालिकेत झालेल्या विशेष आढावा बैठकीदरम्यान आला. शिंदे गटाचे पदाधिकारी महापालिकेत बाहेर येरझार्‍या मारत असताना भाजपचे अनेक पदाधिकारी आणि त्यांचे नातेवाईक मात्र बैठकीत मांडीला मांडी लावून बसलेले पाहावयास मिळाले. यामुळे विशेष बैठक जवळपास भाजपच्याच पदाधिकार्‍यांची हायजॅक केली. या आधीच्या बैठकीत शिंदे गटाच्याच पदाधिकार्‍यांची चलती दिसून आली होती. त्यावेळी भाजपच्या पदाधिकार्‍यांनी पक्षश्रेष्ठींकडे तक्रारी केल्या होत्या. यामुळे यावेळी पालकमंत्री भुसे यांनी आपल्या पदाधिकार्‍यांना दोन पावले दूर ठेवत भाजपलाच जवळ केले. भाजप व शिंदे गटाकडून पालकमंत्रिपदाची घोषणा झाल्यानंतर ना. भुसे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय व महापालिकेत लगेचच पहिली बैठक घेत जम बसविण्याचा प्रयत्न केला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठकीत काही आमदारच उपस्थित राहिले तर मनपात झालेल्या बैठकीत शिंदे गटाचेच पदाधिकारी उपस्थित राहिल्याने बैठक लोकप्रतिनिधींची की राजकीय पदाधिकार्‍यांची असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. महापालिका मुख्यालयात गुरुवारी (दि.3) दुसर्‍या बैठकीचे आयोजन करण्यात आले. शिंदे गटावर मागच्या बैठकीत झालेली टीका लक्षात घेता एकाही पदाधिकार्‍याला बैठकीला बसू दिले नाही. परंतु, दुसरीकडे मात्र भाजपचे शहराध्यक्ष गिरीश पालवे यांच्यासह आमदार देवयानी फरांदे यांचे पुत्र अजिंक्य फरांदे तसेच भाजप प्रवक्ता अमित चव्हाण बैठकीला उपस्थित असल्याचे दिसून आले. यामुळे संबंधितांची उपस्थिती ही शिंदे गटाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी की काय अशी चर्चा बाहेर सुरू होती. पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू असताना भाजपच्या आमदारांनीच बैठक गाजवली. शहरातील गावठाण क्लस्टर, सिडकोतील घरे फ्री होल्ड करणे, अपघात प्रवण क्षेत्र, सिंहस्थ कुंभमेळा, नोकरभरती, सर्वांसाठी घरे अशा विविध मुद्द्यांवर आमदारांनीच बाजी मारून नेली. आमदारांनीच बैठक हायजॅक केल्याने शिंदे गटाकडूनही आता नाराजी व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा:

The post पालकमंत्री दादा भुसे : मनपातील विशेष बैठकीत भाजपचाच वरचष्मा appeared first on पुढारी.