Site icon

पालकमंत्री भुसे यांची घोषणा : ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम राबविणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्हाभरात धर्मवीर आनंद दिघे महाआरोग्य शिबिर आणि शासन आपल्या दारी उपक्रम राबविण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्री दादा भुसे यांनी सोमवारी (दि. 12) केली. महापालिका क्षेत्रात प्रभागनिहाय व ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या गटा अंतर्गत धर्मवीर आनंद दिघे महाआरोग्य शिबिर राबविण्यात येणार आहे. आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन तपासणी करतील. ज्या रुग्णांवर तातडीच्या उपचारांची गरज आहे, त्यांना तालुका, जिल्हास्तरावरील रुग्णालयांमध्ये हलविले जाईल. तसेच जिल्हास्तरावर उपचार व शस्त्रक्रियेची सुविधा नाही, अशा रुग्णांवर मुंबईच्या रुग्णालयामध्ये शासनाच्या विविध योजनांमधून मोफत उपचार केले जातील. तसेच त्यांना घरापासून नेण्याची व आणून सोडण्याची जबाबदारी प्रशासनाची असेल, असेही ना. भुसे यांनी सांगितले. ‘शासन आपल्या दारी’ अंतर्गत आठवड्यातील दोन दिवस अधिकारी-कर्मचारी हे त्या-त्या भागामध्ये जाऊन नागरिकांना आवश्यक ते दाखले, रेशनकार्ड तसेच अन्य सुविधा जागेवर उपलब्ध करून देतील. या शिबिरासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी अगोदरच नागरिकांपर्यंत पोहोचविली जाईल, असेही ना. भुसे यांनी स्पष्ट केले.

लोकप्रतिनिधींनी केल्या सूचना…
‘शासन आपल्या दारी’मध्ये ग्रामीण भागात वीज आणि सर्व्हरची समस्या भेडसावत असल्याची तक्रार ना. नरहरी झिरवाळ यांनी केली. आ. डॉ. राहुल आहेर यांनी 25 डिसेंबरला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती दिनी सुसाशन दिन साजरा केला जातो. त्यामुळे त्या दिवसापासून अभियानांचा शुभारंभ करावा, अशी सूचना केली. सूचनांवर विचार केला जाईल, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

दोन दिवसांमध्ये वेळापत्रक…
महाआरोग्य शिबिराचे सविस्तर वेळापत्रक दोन दिवसांमध्ये घोषित करण्यात येईल, अशी ग्वाही ना. दादा भुसे यांनी दिली. तसेच शिबिरासाठी सामाजिक संस्थांनी मदतीचा हात देऊ केला आहे. त्यात रुग्णांसाठी आवश्यक मोफत चष्मे, जयपूर फूट व अन्य वस्तू देण्याची तयारी संबंधित संस्थांनी दर्शविल्याची माहिती ना. भुसेंनी दिली.

हेही वाचा:

The post पालकमंत्री भुसे यांची घोषणा : ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम राबविणार appeared first on पुढारी.

Exit mobile version