पिंपळनेरच्या आठवडे बाजारात डोंगराची काळी मैना

पिंपळनेर www.pudhari.news

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा
रखरखत्या उन्हाळी हंगामात येणार्‍या फळांची मेजवानी काही औरच असते. काही फळे तर डोंगराच्या कड्या कपाऱ्यात बहरलेले असतात. त्यापैकी डोळ्यांचे पारणे फेडणारे व चवीने गोड, आंबट असे गुलाबी व बाहेरुन काळ्याकुट्ट रंगाच्या आकाराने छोटे असणाऱ्या काटेरी जाळीमध्ये विशेषत: जून महिन्यात पिकणाऱ्या करवंदाची म्हणजे डोंगराच्या या काळ्या मैना बाजारात दाखल झाली आहे. मात्र,  उन्हाच्या तीव्र फटका बसल्याने करवंदाच्या उत्पादनात घट दिसून येत आहे.

यावर्षी हा रानमेवा पिंपळनेरच्या आठवडे बाजारात दाखल झाला तरी बेसुमार वृक्षतोडीमुळे व निसर्गाच्या लहरीपणामुळे दुर्मीळ होत असल्याचे चित्र दिसत आहे. मोसमी पावसाच्या आगमनात करवंद गळून जातात. परंतु गेल्या वर्षापासून आदिवासी पश्चिम पट्यातील परिसरात समाधानकारक पाऊस नसल्याने अती उष्णतेमुळे करवंदांच्या जाळ्या मोठ्या प्रमाणात गळून गेल्या आहेत़. दरवर्षी उन्हाळ्यात करवंदाची फळे मोठ्या प्रमाणात खाल्ली जातात. करवंदामध्ये ‘क’ जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असल्यामुळे मधुमेहांसाठी तसेच त्वचा विकारांवर फायदेशीर ठरत असल्याने त्यामध्ये सायट्रीक ॲसिडच्या मुबलक प्रमाणामुळे तसेच उष्णतेमुळे होणार्‍या आजारांवर करवंद खाने फायदेशीर असते. त्यामुळे पिंपळनेर बाजारात आलेला रानमेवा भाव खाऊन जात आहे.

साक्री तालुक्यातील पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यातील कुडाशी, वार्सा आदी ठिकाणी डोंगराळ भाग जास्त असल्याने या भागात करवंदाची जाळी जास्त प्रमाणात असल्याने डोंगराळ भागातील गावात राहणार्‍या नागरीकांना उन्हाळ्यात उदरनिर्वाहाचे हे एक साधन असल्याने तो रानमेवा गोळा करण्यात येतो. त्यासाठी भल्या पहाटे खेडे पाड्यावरील महिला, नागरिक मोठय़ा प्रमाणात व्यस्त झाले आहेत. एप्रिल व मे महिन्यात येणार्‍या करवंदामुळे अनेकांच्या हाताला रोजगार मिळू लागला आहे. सध्या शेतीची कामे आटोपल्याने महिलांना रोजगार मिळत आहे. पश्चिम पट्यातील परिसरात डोंगराळ भाग जास्त असल्याने करवंदाच्या जाळ्याही मोठ्या प्रमाणावर आहेत. पिकलेली करवंद जाळीतून शिरुन तोडणे जिकिरीचे काम असते. या जाळीला अनुकुचीदार आणि मोठे काटे असल्याने हे काम करणे खूप अवघड असले तरी रोजगार मिळत असल्याने महिला व पुरुष वर्ग करवंद तोडण्याचे काम करत आहेत. अशाप्रकारे एक एक करून दिवसभर करवंद तोडने भर उन्हात तापदायक ठरते. त्यामुळे पहाटे लवकर उठून करवंद काढली जातात. त्यानंतर सकाळी बाजारात विक्रीसाठी आणली जातात. करवंदला बाजारात सध्या 80 ते 100 रुपये किलोचा भाव मिळत आहे.

हेही वाचा:

The post पिंपळनेरच्या आठवडे बाजारात डोंगराची काळी मैना appeared first on पुढारी.