पिंपळनेर : अवैधरीत्या वृक्षतोड करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईची अखिल भारतीय मानवाधिकार संघाची मागणी

पिंपळनेर www.pudhari.news

पिंपळनेर (ता साक्री) : पुढारी वृत्तसेवा
येथील नवापूर व साक्री रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या शासकीय वृक्षांची बेकायदेशीरपणे सर्रास कत्तल होत असल्याबाबत पिंपळनेर वनपरिक्षेत्र कार्यालयाचे वनक्षेत्रपाल यांना लेखी निवेदन देण्यात आले.

पिंपळनेरपासून नवापूर रस्ता व साक्री रस्त्याच्या दुतर्फा पाच वर्षांपूर्वी भरपूर वृक्ष संपदा होती. परंतु वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या उदासीनतेमुळे दरवर्षी दहा ते पंधरा वृक्ष बेकायदेशीरपणे तोडली जात आहेत. रस्त्याच्या दुतर्फा असलेली शासकीय झाडे केमिकल अथवा अन्य मार्गाने सुकवली जातात व शासनाची परवानगी न घेता बेकायदेशीरपणे तोडली जात  आहेत. अशाप्रकारे वृक्षतोड करणाऱ्यांवर कुठलीही कारवाई केली जात नाही. वृक्षांचा वध करुन वृक्ष तोडीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. बेकायदेशीर वृक्षतोड करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत म्हणून दि. 19 मे 2021 रोजी देखील लेखी निवेदन देण्यात आले होते. परंतु त्याची योग्य ती दखल घेतली गेली नाही. त्यामुळे अवैधरीत्या होणाऱ्या वृक्षतोडीत वनपरिक्षेत्र कार्यालयाची मिलीभगत असण्याची दाट शक्यता असल्याची चर्चा होत आहे. या प्रकरणात वनपरिक्षेत्र कार्यालयाकडून त्वरित कारवाई न झाल्यास कर्तव्यात कसूर केल्यामुळे तसेच दप्तर दिरंगाई कायदा 2006 व महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम 1979 मधील तरतुदीनुसार शिस्तभंगाच्या कारवाईची मागणी वरिष्ठांकडे करणार असल्याचा इशारा निवदेनाव्दारे करण्यात आला आहे. यावेळी अखिल भारतीय मानवाधिकार संघाचे पदाधिकारी प्रविण थोरात, प्रशांत कापडणीस, लक्ष्मीकांत अहिराव हे उपस्थित होते.

हेही वाचा:

The post पिंपळनेर : अवैधरीत्या वृक्षतोड करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईची अखिल भारतीय मानवाधिकार संघाची मागणी appeared first on पुढारी.