पिंपळनेर : गव्हाणी घुबडांच्या पिल्लांना शेंदवडच्या निसर्गात केले मुक्त

घुबड www.pudhari.news

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा
येथील सटाणा रोडवरील महाजन नगरमध्ये दि. २० डिसेंबर २०२२ ला वनविभाग व वन्यजीव संरक्षण संस्थेद्वारे पकडण्यात आलेल्या दोन गव्हाणी घुबडांच्या पिल्लांना अखेर दाट जंगलात निसर्गात मुक्त करण्यात आले आहे.

पिंपळनेर येथील महाजननगर येथे दि. २० डिसेंबरला दोन गव्हाणी घुबडांच्या पिल्लांना पकडण्यात आले होते. ही पिल्ले लहान असल्यामुळे ती उडण्याच्या स्थितीत नव्हती. यामुळे प्राण्यांकडून त्यांची शिकार होऊ शकते ही बाब लक्षात घेऊन वनविभाग पिंपळनेर यांनी पिल्ले पुढील संगोपनासाठी शहरातील वन्यजीव संरक्षण संस्था यांच्या ताब्यात दिली. वन्यजीव संरक्षण संस्थेचे सदस्यांनी पिल्लांची उत्तम देखरेख करत पिल्लांचे संगोपन केले. तसेच ही पिल्ले १५ दिवसांची झाल्याने उडण्यास पूर्णपणे सक्षम झाली असून आता या पिल्लांना वनविभाग पिंपळनेरचे पदाधिकारी व वन्यजीव संरक्षण संस्थेचे सदस्यांच्या उपस्थितीत तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील शेंदवड येथील दाट जंगलात सोडण्यात आले आहे. घुबडांना मुक्त करताच त्यांनी उंच भरारी घेत जंगलामध्ये मार्गक्रमण केले. यावेळी पिंपळनेर वनविभागाचे वनपाल संदीप मंडलिक, वनरक्षक अमोल पवार, वन्यजीव संरक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड, उपाध्यक्ष दानिश पटेल, स्वप्नील चौधरी, तेजस काकुस्ते आदी उपस्थित होते.

हेही वाचा:

The post पिंपळनेर : गव्हाणी घुबडांच्या पिल्लांना शेंदवडच्या निसर्गात केले मुक्त appeared first on पुढारी.